|
नगरपालिकेच्या मालकीच्या आरक्षण क्रमांक ५२ मधील गाळेधारकांकडे पालिकेचे भाडेकरारापोटी ५२ लाख १८ हजार ५ रुपये थकीत होते. याबाबत नोटीस देऊनही दाद न देणाऱ्या गाळेधारकांविरोधात पालिकेने कारवाईचा बडगा उगारला. यावेळी पालिकेच्या पथकाने उप मुख्याधिकारी पी.एम.पवार यांच्या मार्गदर्शनाखाली १० गाळे सील केले आहेत. पालिकेच्या मालकीचे मोक्याच्या जागी शेकडो गाळे असून ते भाडेकरारावर व्यापाऱ्यांना दिलेले आहेत. परंतु, अनेक व्यापाऱ्यांकडून भाडेकराराची रक्कम वेळच्यावेळी भरली जात नसल्याने आरक्षण क्रमांक ५२ मधील १७ गाळेधारकांकडे एकूण ५२ लाख १८ हजार ५ रुपयांची रक्कम थकीत होती. सदरील थकीत भाडे भरण्यात यावे याकरीता नगरपालिकेच्या वसुली पथकाने अनेकदा संबधित व्यापाऱ्यांना नोटीस देऊन थकबाकीची मागणी केली होती. परंतु, तरीही व्यापाऱ्यांकडून पालिकेच्या नोटीसला केराची टोपली दाखविण्याचा प्रकार घडत होता. यामुळे पालिकेने कठोर भुमिका घेत बुधवारी (दि.२०) दुपारी अचानक जिल्हा बँकेसमोरील आरक्षण क्रमांक ५२ येथे जाऊन थकीत भाडेवसुलीसाठी कारवाईचा बडगा उगारत थकबाकीदारांचे गाळे सील करण्यास प्रारंभ केला. यावेळी पालिकेकडे एकूण १७ थकबाकीदार गाळेधारकांची यादी होती. यावेळी काही गाळेधारकांनी जागेवरच थकबाकीपोटी रकमेचा धनादेश दिल्याने कारवाई टळली तर उर्वरीत १० गाळे मात्र सील करण्यात आले. यावेळी पथकप्रमुख तथा उप मुख्याधिकारी पी.एम.पवार, सहाय्यक उमेद आर्दड, मधुकर मोरे, राजकुमार शिंदे, सुतार पाटील, राजेंद्र शेरकर, पवन बोधले, माजीद शेख, सूर्यकांत शेरकर आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.
|