उस्मानाबाद/प्रतिनिधी- स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना आत्मविश्वास वाढविण्यासाठी पुस्तकी अभ्यासाव्यतिरिक्त वेगवेगळ्या तंत्राचा अवलंब केला जातो. यापैकी एक प्रसिद्ध तंत्र एनएलपी (न्यूरो लँग्वेस्टिक प्रोग्रॉमिंग) आहे. या तंत्राद्वारे विद्यार्थ्यांनी परीक्षेला आत्मश्विासाने सामोरे जाण्यासाठी कमी वेळेत जास्तीत जास्त अभ्यास कसा करावा, अभ्यास लक्षात राहण्यासाठी कोणत्या गोष्टी ध्यानात ठेवाव्यात आदी विषयांवर व्यक्तीमत्त्व विकास प्रशिक्षक अर्शद सय्यद यांनी एकदिवसीय कार्यशाळेत मार्गदर्शन केले. या कार्यशाळेला उस्मानाबाद शहर व तालुक्यातील विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला.उस्मानाबादसारख्या मागास भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या युगात सक्षमपणे सामोरे जाण्यासाठी त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणे गरजेचे आहे. या हेतुने शहरातील रायगड फंक्शन हॉल येथे या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेस परभणी येथील के.के.एम. कॉलेजचे प्राचार्य डॉ. भास्कर मुंडे, तेरणा महाविद्यालयाचे प्रा. डॉ. रशीद सय्यद यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यशाळेत विद्यार्थ्यांना नैराश्यापासून दूर राहण्यासाठी काय करावे, मनोबल उंचावण्यासाठी कोणत्या तंत्राचा अवलंब करावा तसेच कमी वेळेत जास्तीत जास्त अभ्यास करण्यासाठीचे तंत्रज्ञान, केलेला अभ्यास लक्षात राहण्यासाठी काय करावे तसेच व्यक्तीमत्त्व विकास कसा करावा आदी विषयांवर प्रशिक्षक सय्यद यांनी प्रात्यक्षिकाद्वारे माहिती दिली.
अंजुमन हेल्थकेअर सोसायटीचे अध्यक्ष फेरोज पल्ला, प्रा. दीपक भराटे, प्रा. समाधान देशमुख तसेच उस्मानाबाद शहरातील विविध महाविद्यालयातील प्राध्यापक, पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी सुलतान मशायक यांनी परिश्रम घेतले.