राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने उस्मानाबाद मध्यवर्ती कार्यालयामार्फत उस्मानाबाद एसटी आगाराच्या ताफ्यात नवीन चार शिवशाही वातानुकुलित बस दाखल झाल्या आहेत. या बसचा बुधवारी (दि.20) सायंकाळी शुभारंभ करण्यात आला असून या शिवशाही बस औरंगाबाद, सोलापूर व लातुर या मार्गावर दिवसभर फे-या करणार असल्याने या मार्गावरील प्रवाशांची सोय झाली आहे.
उस्मानाबाद शहरातून विविध शासकीय कामे, कोर्ट कच-यासह शैक्षणिक कामाकरीता औरंगाबाद येथे जाणाऱ्या नागरिकांची संख्या प्रचंड आहे. तसेच विविध कामानिमित्त लातुर व सोलापूर येथेही दररोज हजारो नागरिक, व्यापारी ये-जा करतात. या मार्गावर साध्या व शिवशाही बसची व्यवस्था असली तरी शिवशाही बसची संख्या व फे-या कमी होत्या. दरम्यान, उस्मानाबाद विभागाच्या मध्यवर्ती कार्यालयाकडून उस्मानाबाद आगाराला नुकत्याच चार शिवशाही बस मिळाल्या आहेत. आगारप्रमुखांनी प्रवाशांची मागणी व वर्दळ लक्षात घेता या शिवशाही बस औरंगाबाद, लातुर व सोलापूर या मार्गावर सुरू करण्याचा निर्णय घेऊन त्यानुसार या सेवेचा बुधवारी सायंकाळी उस्मानाबाद बसस्थानकावर जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांच्या हस्ते शुभारंभ झाला. यावेळी विभागीय वाहतुक नियंत्रक राजीव साळवे, यंत्र अभियंता साळुंके, कार्यशाळा अधीक्षक अलकुंटे, स्थानक प्रमुख रामचंद्र शिंदे, संतोष जगदाडे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी व प्रवाशी उपस्थित होते. या नवीन बससेवेमुळे सदरील मार्गावर शिवशाहीतून प्रवाशांचा आरामदायी प्रवास होण्यास मदत होणार आहे.