उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये आर्थिक गणनेच्या बाबतीत CSC e-Governance services India Ltd यांना मार्गदर्शन करणे, प्रत्यक्ष क्षेत्रीय कामावर(filed work) नियंत्रण ठेवणे तसेच राज्यस्तर व केंद्रस्तरावर समन्वय ठेवण्याकरीता जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली 15 सदस्यीय जिल्हास्तरीय सनियंत्रण व समन्वय समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. संबंधित संस्थेने निश्चित संख्येप्रमाणे प्रगणक व पर्यवेक्षक यांची नोंदणी करणे, परीक्षा घेणे, उत्तीर्ण उमेदवारांना नियुक्ती देणे, प्रशिक्षण देणे, ओळखपत्र देणे
इ. बाबी तातडीने पूर्ण करणे आवश्यक आहे. जिल्हयामध्ये आर्थिक गणनेचे काम पूर्ण करण्याकरीता 1 हजार 40 प्रगणक व 640 पर्यवेक्षकांची आवश्यकता असून संबंधित संस्थेने आजपर्यंत 814 प्रगणक व 697 पर्यवेक्षकांची नोंदणी पूर्ण केलेली आहे. राज्य शासनाच्या नियोजन विभागाकडून राज्यामध्ये दिनांक 26 नोव्हेंबर 2019 पासून आर्थिक गणनेचे प्रत्यक्ष क्षेत्रीय काम सुरु करण्याचे प्रस्तावित केले आहे. त्या दृष्टीने CSC e-Governance services India Ltd या संस्थेने प्रत्यक्ष क्षेत्रीय काम सुरु करण्याकरीता तयारी केलेली आहे. आर्थिक गणनाचे प्रत्यक्ष क्षेत्रीय काम तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये पूर्ण करण्यात येणार आहे.
आर्थिक गणना Collection of Statistical Act 2008 या कायद्याअंतर्गत पूर्ण करण्यात येणार असून कुटुंबांची, आस्थापनेची संपूर्ण माहिती प्रत्येक स्तरावर गोपनीय राहणार आहे. तसेच आर्थिक गणनेच्या प्रत्यक्ष क्षेत्रीय कामांतर्गत कुटुंबाने किंवा आस्थापनाने चुकीची किंवा माहिती देण्यास नकार दिल्यास या कायद्यांतर्गत दंडात्मक कारवाईची तरतूद केलेली आहे. आर्थिक गणना अचूकपणे तसेच विहित मुदतीमध्ये पूर्ण करण्याकरिता सहकार्य करावे, असे जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे व जिल्हा सांख्यिकी अधिकारी श्री.जाधव यांनी जिल्हयातील सर्व नागरिकांना तसेच सर्व आस्थापनांना आवाहन केले आहे.