मुरूम/प्रतिनिधी-मुरूम शहरात चार ठिकाणी घरफोडी करून चोरट्यांनी दागिन्यासह रोख रक्कमेवर डल्ला मारत लाखोंचा ऐवज लंपास केला आहे. रविवारी (दि.25) सकाळी उघडकीस आलेल्या या चोरीच्या घटनेने परिसरात घबराट निर्माण झाली असून चोरट्यांनी पोलिसांसमोर आवाहन उभे केले आहे. चोरांचा माग काढण्यासाठी मुरूम पोलिसांकडून श्वान पथकाला पाचारण करण्यात आले मात्र, माग मिळू शकला नाही.
मुरूम शहरातील यशवंत नगरमधील नरसिंग शिवाजी कदम यांच्या घराच्या पाच दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. घरातील कपाटाची तोडफोड करून पाच तोळे सोन्यासह 27 हजाराची रोख रक्कम, एक मोबाईल हँडसेट, साधे मोबाईल असे एकूण दोन लाखांचा मुद्देमाल चोरून नेला. तसेच जवळच असलेल्या संजय वैरागकर यांच्याही घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. या घरातील कपाट तोडून एक तोळा सोने पळवले आहे. याच भागातील सूर्यवंशी यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. मात्र, याठिकाणी हाती काहीच लागले नाही. यासोबतच शिवाजी चौकात असलेल्या मुख्य रस्त्यावरील बेंगलोर बेकरी दुकानाचे शटर उचकटून चोरट्यानी सातशे रुपये, कोल्ड्रिंक्स चोरून नेले. याप्रकरणी पोलिसांत अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. चोरांचा माग काढण्यासाठी मुरूम पोलिसांकडून श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. मात्र, माग मिळू शकला नाही. चोरीच्या या घटनेने मुरूमसह परिसरात घबराट पसरली आहे.