
उमरगा शहरातील पतंगे डांबरी रस्त्याच्या कामाचा सहा महिन्यांपूर्वी कार्यारंभ आदेश देऊनही गुत्तेदाराने अद्याप काम सुरू केले नव्हते. त्यात हा रस्ता फक्त 500 मीटर डांबरीकरण करण्याला मंजुरी मिळाल्याने या रस्त्याचे अर्धवट डांबरीकरण करण्यास विरोध करीत नागरिकांनी पालिकेत जाऊन नगराध्यक्षां व मुख्याधिका-यांना धारेवर धरले. पूर्ण रस्त्याची व बाजूने गटारीचे मागणी केली यावेळी पूर्ण लांबीचा रस्ता व बाजूने गटारी येत्या चार महिन्यात करण्याचे अश्वासनंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
उमरगा शहरातील प्रमुख रस्ता असलेला पतंगे रोडची गेल्या पाच वर्षांपासून डांबरीकरण न केल्याने प्रचंड दुरवस्था झाली आहे.पूर्ण रस्त्यावर खड्ड्याचे साम्राज्य असल्याने या मार्गावरून प्रवास करणार्यांना मोठा त्रास होत आहे.या रस्त्याचे 500 मीटर डांबरीकरण साठी पालिकेकडून 42 लाख रुपयाचा निधी मंजूर होऊन निविदा प्रक्रिया ही झालेली होती. पण संबंधित गुत्तेदार कार्यारंभ आदेश मिळूनही हे काम करण्यास टाळाटाळ करीत होता. त्यामुळे 21 नोव्हेंबर रोजी नागरिकांनी आठ दिवसात काम सुरू नाही झाल्यास पालिकेला टाळे ठोक आंदोलनाचा इशारा दिला होता. सदरील कामाला दि. 27 रोजीपासून सुरुवातही केली होती. पण नागरिकांनी पूर्ण रस्त्याची मागणी करीत गुरुवारी दि. 28 रोजी पालिकेत मुख्याधिका-यांच्या दालनासमोर हलगी आंदोलन सुरू केले. शेकडो नागरिक यावेळी उपस्थित होते. नागरिकांची संख्या पाहता त्यांच्यासोबत पालिकेतील सभागृहात चर्चा ठेवण्यात आली. यावेळी सभागृहात नगराध्यक्षा सौ. प्रेमलता टोपगे, मुख्याधिकारी प्रकाश पाटील, शिवसेनेचे गटनेते संतोष सगर व पालिकेतील कर्मचारी उपस्थित होते. यावेळी नागरिकांनी पतंगे रोड महामार्ग ते महात्मा बसवेश्वर असा संपूर्ण लांबीचा रस्ता डांबरीकरण करावा व दोन्ही बाजूने गटारी कराव्यात त्याच बरोबर इतर समस्यां सोडविण्याची मागणी केली व अर्धवट 500 मीटर डांबरीकरणास विरोध केला. नागरिकांनी नगराध्यक्षां टोपगे व मुख्याधिकारी पाटील यांना जवळपास एक तास धारेवर धरले होते शेवटी येत्या एप्रिल महिन्यापर्यंत राष्ट्रीय महामार्ग ते माळी लवण रस्त्याचे व गटारीचे काम सर्व प्रशासकीय बाबी पूर्ण करन्यात येईल असे लेखी आश्वासन नगराध्यक्ष यांनी दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
यावेळी नगरसेवक संतोष सगर यांनीही मुख्याधिकार्यांना व नगराध्यक्षना हे काम लवकरात लवकर करून देण्याचे आवाहन केले. यावेळी माजी नगरसेवक दत्ता रोंगे, मनोज जाधव,डॉ. लक्ष्मीकांत डिग्गीकर, डॉ.अनिकेत इनामदार, व्यापारी महासंघचे कार्याध्यक्ष नितीन होळे,अप्पा दळगडे, भीम मोहिते, अमोल पाटील, आर सी पाटील, सुनील औरादकर, संजय कोथळीकर, राजेंद्र पाटील, राजेंद्र उबाळे, युसुफ बागवान आदींसह शेकडो नागरिक यावेळी उपस्थित होते.