कळंब/प्रतिनीधी-
रोटरी क्लब ऑफ कळंब सिटी आणि कै महादेव गव्हार क्रिडा मंडळ येडशी यांच्या संयुक्त विद्यमाने 20 नोव्हेंबर2019 ते 22 नोव्हेंबर 2019 या कालावधीत शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या खुल्या गटातील राज्यस्तरीय आट्या पाट्या स्पर्धेत महिला गटात यजमान उस्मानाबाद ने प्रथम तर पुरुष गटात जळगाव संघ प्रथम पारितोषिकाचे मानकरी ठरले. महिला गटात भंडारा जिल्हा द्वितीय, ठाणे जिल्हा तृतीय, तर नागपूर जिल्हा चतुर्थ क्रमांकावर राहिले. पुरुष गटात द्वितीय क्रमांक वाशीम, तृतीय क्रमांक उस्मानाबाद तर चतुर्थ क्रमांक अकोला जिल्ह्याने मिळविला. 
    महिला गटाचा अंतिम सामना यजमान उस्मानाबाद व भंडारा यांच्यात झाला.त्यात उस्मानाबाद जिल्ह्याने आक्रमक खेळ करून विजयश्री खेचून आणली तर पुरुषांच्या अत्यंत चुरशीच्या अंतिम लढतीत सलग सात वर्षे अपराजित असलेल्या वाशीम संघावर रोमांचक विजय मिळवून इतिहास घडविला. महिला गटात उत्कृष्ट खेळाडू म्हणून भंडारा संघातील  कु प्रिया गोमासे तर पुरुष गटात जळगाव संघातील खेळाडू विजय न्हावी यांची निवड करण्यात आली.
 स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा कळंब नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ सुवर्णाताई मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली व आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. याप्रसंगी व्यासपीठावर महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य आट्या पाट्या संघटनेचे सचिव प्राचार्य डॉ दीपक कवीश्वर, रोटरी जिल्हा 3132 चे भावी प्रांतपाल रो डॉ ओमप्रकाश मोतीपवळे, कळंब पंचायत समितीचे सभापती दत्ता साळुंके, प्राचार्य डॉ अशोक दादा मोहेंकर प्राचार्य श्रीधर भवर,, प्रा डॉ चांद्रजीत जाधव , तालुका क्रीडाधिकारी कु सारिका काळे, प्रा अमरकांत चकोले, रोटरी क्लब ऑफ कळंब चे सचिव प्रा डॉ हनुमंत चौधरी,  उस्मानाबाद जिल्हा आट्या पाट्या संघटनेचे सचिव शरद गव्हार, स्पर्धेचे स्वागताध्यक्ष प्रा संजय घुले उपस्थित होते. 
   शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. विजेत्या संघांना व्यासपीठावरील मान्यवरांच्या उपस्थितीत आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांच्या हस्ते पारितोषिक वितरित करण्यात आहे. आपले मनोगत व्यक्त करताना आमदार पाटील यांनी खेळाडूंना सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.
आमदार राणा दादांनी केला वीजेत्या संघावर बक्षिसांचा वर्षाव
या स्पर्धेतील विजेत्या संघाला कोणतेही रोख स्वरूपात बक्षीस नव्हते. पण आमदार राणा दादा पाटील यांनी महिला व पुरुष गटातील प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या संघास रु 25000/-, द्वितीय क्रमांक मिळविणाऱ्या संघास रु 15000/- तर तृतीय व चतुर्थ क्रमांक मिळविणाऱ्या संघास रु 10000/- बक्षीस जाहीर करून स्पर्धेचा शेवट गोड केला..अचानक मिळालेल्या या रोख स्वरूपातील बक्षिसामुळे खेळाडूंचा आनंद द्विगुणीत झाला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वागताध्यक्ष प्रा संजय घुले यांनी केले. सूत्रसंचालन हनुमंत हंबीरे यांनी केले तर आभार श्री अनिल शिंदे यांनी मानले.
     स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्व रोटरी सदस्य,राजाभाऊ शिंदे,परमेश्वर मोरे,  सुनील बोरकर, हरिभाऊ पांचाळ, दशरथ शिंदे.शंकर माने, रमेश मोहिते, लक्ष्मण तात्या मोहिते, प्रा बाळकृष्ण भवर, ओंकार काळे, वैभव धुमाळ यांनी परिश्रम घेतले.
 
Top