उस्मानाबाद/प्रतिनिधी-
पक्षांतराच्या लाटेमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा दणका बसला असून, दोन्ही पक्षाचे जिल्हाध्यक्ष आठवड्यातच पक्षातून बाहेर पडल्याने सध्या दोन्ही पक्षाला जिल्हाध्यक्ष नाहीत. जिल्ह्यातील बहुतांश सहकारी संस्था, स्थानिक संस्था आणि ग्रामपंचायती, सोसायट्या ताब्यात असल्याने राष्ट्रवादी व काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद मिळण्यासाठी स्पर्धा दिसत असली तरी काँग्रेसकडे अजून तशी स्पर्धा लागलेली दिसत नाही. त्यामुळे येणा-या काळात जिल्हाध्यक्षपद कोणाला, यावरच जिल्ह्याचे राजकारण अवलंबून आहे.
शिवसेना-भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश करणा-यांची संख्या वाढतच असून, चार दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे आमदार तथा जिल्हाध्यक्ष राणाजगजितसिंह पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर दोन दिवसानंतर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रशंात चेडे यांनीही शिवसेनेत प्रवेश करून राजकीय खळबळ उडवून दिली.त्यानंतर दोन्ही राजकीय पक्षांना दणका बसल्याचे मानले जात असले तरी या नेत्यांसोबत नेमका कोणी पक्ष सोडला, आणखी कोण-कोण बाहेर आहे, याबाबतचा खुलासा होऊ शकलेला नाही. मात्र, दोन्ही पक्षाच्या जिल्हाध्यक्षांनी पक्षांतर केल्यामुळे राजकीय उलथापालथ होणार हे निश्चित. या पार्श्वभूमीवर अनेक पदाधिकारी मात्र आपली भूमिका ठरविण्याच्या मानसिकेत दिसत आहेत. आमदार राणा पाटील यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसकडे जिल्हा परिषद, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, कळंब-तुळजापूर नगर परिषद, अशा प्रमुख संस्था होत्या. मात्र, या संस्था आता नेमक्या कोणाच्या ताब्यात आहेत, राजकीयदृष्ट्या संस्थेतील पदाधिका-यांनी कोणाला स्विकारले, याचा अंदाज अजूनही आलेला नाही. तुळजापूर नगर परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी मात्र आम्ही भाजपमध्ये दाखल झालोय, असे स्पष्ट केलेले असले तरी अन्य संस्थांबाबत अजूनही संभ्रम आहे. पक्षाचे जिल्हाध्यक्षपद रिक्त असल्याने इच्छुक नेत्यांनी पक्षनेतृत्वाच्या भेटी घेण्यास सुरुवात केली आहे. पक्षासाठी आजवर केलेली कामे आणि पुढील प्लानिंग घेऊन अनेक इच्छुक श्रेष्ठींकडे आपली ताकद वापरत आहेत.

 
Top