उस्मानाबाद/ प्रतिनिधी-
निसर्गाच्या लहरीपणामुळे पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. गेल्या सात वर्षांत तब्बल पाचव्यांदा मराठवाडा पाणीटंचाई सोसत आहे.मराठवाड्यातील पिण्याच्या पाण्याची टंचाई कायमची दूर करण्यासाठी प्रस्तावित केलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा ड्रीम प्रोजेक्ट् असलेल्या "मराठवाडा वॉटर ग्रीड" या पिण्याच्या पाण्याच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.त्यात उस्मानाबाद जिल्ह्याचा समावेश करण्यात आला असून उस्मानाबाद जिल्ह्याला कृष्णा खोऱ्यातील उजनी धरणातून व गोदावरी खोऱ्यातून  एकूण ७२७ किमी लांबीच्या पाईपलाईन मधून पाणी देण्यात येणार आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यासाठी प्रस्तावित ग्रीडच्या मुख्य व दुय्यजलवाहिन्या, जलशुद्धीकरण यंत्रणा यासह विविध ठिकाणी अनुषंगिक कामांसाठी १४०९.५७ कोटींच्या पहिल्या प्रस्तावास मंत्रिमंडळाने नुकतीच मान्यता दिली आहे. या प्रकल्पासाठी इस्त्रायलच्या मे. मेकोरोट डेव्हलपमेंट ॲण्ड एंटरप्रायजेस या कंपनीसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे.
सातत्याने वाट्याला येणारी दुष्काळी परिस्थिती परिणामी भूजल व भुपृष्ठावरील  पाण्याच्या साठ्यात होणारी घट यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यात यावर्षी जुलैअखेर १५९ गावात २११ टँकर सुरू होते.चारा आणि पिण्याच्या पाण्यासाठी लोकांना वणवण भटकावे लागत आहे.भर पावसाळ्यात देखील आज जिल्ह्यात टँकर चालू आहेत ही परिस्थिती लक्षात घेता मराठवाठा वॉटर ग्रीड मध्ये उस्मानाबाद जिल्ह्याचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
उस्मानाबाद जिल्ह्याचा पाणीपुरवठा ३ क्षेत्रात विभागण्यात आला असून यात कृष्णा खोऱ्यातील उजनी धरण व गोदावरी खोऱ्यातुन पाणी देणे प्रस्तावित आहे.अशुद्ध पाण्यासाठी २१४ किमी पाईपलाईन अशुद्ध पाणी आणून ते उस्मानाबाद जलशुद्धीकरण केंद्र,मांजरा (कळंब),वाशी व लोअर तेरणा (माकणी) या चार जलशुद्धीकरण केंद्रात प्रतिदिन एकूण १८१ एम.एल.डी.पाणी शुद्ध करून ५१३ किमी लांबीच्या पाईपलाईनद्वारे जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये पूरवठा करण्यात येणार आहे.शास्वत पाण्याचा स्रोत असलेल्या उजनी धरणातून जिल्यातील आठही तालुक्यात पिण्याचे पाणी देता येणार आहे हे या योजनेचे वैशिष्ट्य आहे.

या योजनेत एकूण ११ धरणं एकमेकांना जोडण्यात येणार आहेत व या लूप पद्धतीमुळे एका स्रोतातुन पाणी उपलब्ध होत नसल्यास पर्यायी स्रोतातून पाणी घेण्याची तरतूद असल्याने  या योजनेद्वारे पिण्याच्या पाण्याचा शाश्वत पुरवठा होऊ शकेल. हा प्रकल्प हे मराठवाडा टंचाईमुक्त होण्याच्या दिशेने उचललेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. जिल्ह्यात पाणी आणण्यासाठी एक मुख्य ग्रीड व त्यानंतर पुढे तालुका स्तरावर पाणी पोहचवण्यासाठी दुय्यम ग्रीड प्रस्तावित करण्यात आली आहे.प्रस्तावित ग्रीडद्वारे २० किमी परिघातील गावांना पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.अशा प्रकारे जिल्यातील सर्व शहरं, गावं व वाड्या वस्त्यांवरती याद्वारे शुद्ध पाण्याचा पुरवठा केला जाणार आहे.
उस्मानाबाद शहराला उजनी धरणातून पाणीपुरवठा करण्याबाबत निर्णय घेतला त्यावेळी अनेकांनी ही बाब अशक्यप्राय असल्याचे म्हणत ते एक दिवास्वप्न असल्याची टीका केली होती.मात्र प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावर, सातत्यपूर्ण पाठपुरावा व अविरत कष्ट घेतल्याने सदर योजना पूर्ण झाली व कार्यान्वित देखील झाली.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली मराठवाडा वॉटर ग्रीड देखील निश्चित पूर्णत्वाकडे जाईल. उस्मानाबाद जिल्हा टंचाईमुक्त करण्यासाठीच्या या महत्वपूर्ण प्रकल्पाला गती मिळावी व तो कालबद्ध रित्या पूर्ण व्हावा यासाठी सर्वच राजकीय पक्षाच्या मंडळींनी पक्षीय अभिनिवेष बाजूला ठेवत एकदिलाने सांघिक प्रयत्न करावेत असे आवाहन राणाजगजीतसिंह पाटील यांनी केले आहे.
 
Top