उस्मानाबाद /प्रतिनिधी- राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत कुष्ठरूग्ण शोध अभियान, सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत सक्रिय क्षयरूग्ण शोध मोहीम व असंसर्गजन्य रोग प्रतिबंध जागरूकता अभियानाचा शुभारंभ उस्मानाबाद येथील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आला.राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने दि. 13 ते 28 सप्टेंबर या कालावधीत हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत उस्मानाबाद शहरातील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने कुष्ठरोग व क्षयरूग्ण शोध मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शकील अहमद खान, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ऐवळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. खडकी, कुष्ठरोग तंत्रज्ञ कविटकर, आरोग्य सेवक मगर, काकडे, यांच्यासह परिचारिका, आरोग्य सेविका उपस्थित होत्या.
सध्या आशा कार्यकर्त्या बेमुदत संपावर गेल्यामुळे शहरी विभागातील कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम विस्कळीत झाला होता. परंतु उस्मानाबादचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राज गलांडे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. धनंजय पाटील यांनी पुढाकार घेऊन परिचारिका प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थींना या कार्यासाठी प्रेरित करून सहभागी केल्यामुळे शोध मोहिमेच्या कार्यातील अडथळा दूर झाला आहे. शोधमोहिमेदरम्यान डॉ. शकील अहमद खान यांनी उस्मानाबाद शहरातील ख्वाजा नगर भागात कुष्ठरोग आणि क्षयरोगाविषयी माहिती देऊन शोध मोहीम अभियानास सर्व नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले. यावेळी अंजुमन फाऊंडेशनचे अध्यक्ष फेरोज पल्ला, निजाम शेख, असलम शेख, खालेद सय्यद, फेरोज मुल्ला, जावेद काझी आदी उपस्थित होते.