उस्मानाबाद/प्रतिनिधी- उस्मानाबादसारख्या मागास भागात उस्मानाबाद डिस्ट्रीक्ट रायफल असोसिएशनच्या वतीने रायफल शुटींग स्पर्धा घेऊन नेमबाजीत करियर करू इच्छिणार्या मुला-मुलींना मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. अशा स्पर्धांमुळे उस्मानाबाद जिल्ह्यातूनही देशाला नेमबाजी स्पर्धक मिळतील, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी व्यक्त केले.क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद व उस्मानाबाद डिस्ट्रीक्ट रायफल असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने शहरातील भानूनगर येथील तावडे कॉम्प्लेक्स येथे आयोजित जिल्हास्तरीय रायफल शुटींग स्पर्धेचे उद्घाटन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, जिल्हा पोलीस अधीक्षक राजतिलक रोशन, जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले यांच्या हस्ते सोमवारी (दि.16) करण्यात आले . यावेळी त्या बोलत होत्या. उद्घाटन समारंभास क्रीडा अधिकारी अशोक बनसोडे, उस्मानाबाद डिस्ट्रीक्ट रायफल असोसिएशनचे अध्यक्ष अजीम शेख, कोषाध्यक्ष फेरोज पल्ला, तुळजापूर सैनिकी स्कुलचे शिक्षक बिलकुले, एकलव्य आश्रमशाळेचे शिक्षक जळके, तोडकरी, नीलेश प्रधान, झीनत प्रधान, तौफीक सिद्दीकी, प्रशिक्षक उमदाबी सिद्दीकी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना जिल्हाधिकारी मुधोळ-मुंडे म्हणाल्या, उस्मानाबाद डिस्ट्रीक्ट रायफल असोसिएशनच्या माध्यमातून येथील खेळाडूंना नवे क्षेत्र खुले होऊन ग्रामीण भागातील खेळाडूंनाही गुणवत्ता सिद्ध करून दाखवण्याची संधी उपलब्ध झाली आहे, असे सांगून असोसिएशनच्या कार्याचे त्यांनी कौतुक केले. असोसिएशनच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक ती मदत करण्याबरोबर खेळासाठी मैदान उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हा पोलीस अधीक्षक रोशन म्हणाले, की रायफल शुटींग हा महागडा खेळ म्हणून ओळखला जातो. मात्र रायफल असोसिएशनने हा खेळ नाममात्र शुल्कात उपलब्ध करून दिल्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील खेळाडूंची सोय झाली आहे.
14, 17 आणि 19 या तीन वयोगटात घेण्यात येत असलेल्या या स्पर्धेत उस्मानाबाद शहरातील पोद्दार इंग्लिश स्कुल, ग्रीनलॅन्ड, अभिनव, छत्रपती शिवाजी हायस्कुल, श्रीपतराव भोसले हायस्कुल, विद्यामाता इंग्लिश स्कुल, सैनिकी विद्यालय तुळजापूर, एकलव्य आश्रमशाळा यमगरवाडी यासह जिल्ह्यातील विविध शाळांमधील शंभराहून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवल्याची माहिती डिस्ट्रीक्ट रायफल असोसिएशनचे अध्यक्ष अजीम शेख यांनी दिली. प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे स्वागत असोसिएशनच्या वतीने करण्यात आले. स्पर्धेचे सुत्रसंचालन अर्शद सय्यद यांनी केले.