|
उस्मानाबाद/प्रतिनिधी-कर्जमाफीसह अन्य मागण्यांसाठी गेल्या तीन वर्षापासून सुरू लढ्याची शासन पातळीवरून अद्याप दखल घेतली नाही. त्यामुळे राज्यभरात सोमवारी (दि.९) पॉलिहाऊस, शेडनेटधारक शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. यानुसार उस्मानाबादेतही महाराष्ट्र राज्य पॉलिहाऊस, शेडनेटधारक शेतकरी समन्वय समितीतर्फे धरणे आंदोलन करून निवेदन देण्यात आले.
दुष्काळ, नापिकी, उत्पादन खर्चाच्या तुलनेत शेतमालाला अत्यल्प भावामुळे गेल्या पाच-सहा वर्षात राज्यातील पॉलीहाऊस-शेडनेटची शेती तोट्यात गेली. तसेच ही शेती योजना अंमलबजावणीतील चुकीच्या शासन धोरणांचा या शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. नोकरीच्या मागे न लागता आधुनिकतेची कास धरत अनेक उच्चशिक्षित तरुण पॉलिहाऊस-शेडनेट शेतीकडे वळाले. मात्र वेगवेगळ्या प्रतिकूल परिस्थितीमुळे या तोट्याच्या शेतीतून डोक्यावरील बँक कर्जाचा डोंगर वाढला. मात्र, मागण्यांची दखल घेतली जात नसल्याने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यभर सोमवारी धरणे आंदोलन करण्यात अाले. यामध्ये उस्मानाबादेत शेतकरी मनोज पडवळ, अमोल रणदिवे, संजय पवार, काका घोगरे, उमेश शेळके, किशोर हंगरकर, दत्ता शितोळे व इतर जिल्ह्यातील शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते. राज्य पॉलिहाऊस, शेडनेटधारक शेतकरी समन्वय समितीतर्फे धरण देण्यात आले. | ||