उस्मानाबाद/प्रतिनिधी-
बीएसएनएल कार्यालयाकडून वाहनांचे 35 लाख रुपयांचे बिल मिळत नसल्यामुळे मंगळवारी  एकाने कार्यालयातील टॉवरवर चढून आत्मदहनाचा प्रयत्न केला. बीएसएनएलच्या मुंबई येथील वरिष्ठ अधिकाऱ्याने 15 दिवसांत बिल काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर पाऊण तासानंतर खाली उतरवण्यात आले. घटनास्थळी तहसीलदार, पोलिस, बीएसएनएलचे अधिकारी दाखल झाले होते.
उस्मानाबाद येथील दिलीप सोलवट हे दहा वर्षांपासून बीएसएनएलच्या कार्यालयात बोलेरो गाड्या भाड्याने लावत आहे. या वर्षीचे टेंडरही त्यांनी घेतले असून 9 बोलेरो गाड्या बीएनएनएल कार्यालयात लावल्या आहेत. प्रत्येक गाडीला महिन्याला 30 हजार रुपये मिळतात. यामध्ये पेट्रोल, चालक व इतर खर्च वानमालकांकडे असून महिन्याला 1500 किमी वाहन चालवावे लागते. मात्र, एक वर्षांपासून त्यांच्या 9 वाहनांचे जवळपास 35 लाख रुपयांचे बिल निघत नाही. दर तीन ते चार महिन्याला अधिकाऱ्यांची बदली होत असून प्रत्येक वेळी नवीन अधिकारी वाहने सुरू ठेवा बिल काढून देतो, असे सांगून वाहनांचा वापर करत होते. तसेच जिल्हास्तरावरून वरिष्ठ स्तरावर बिला पाठवले जात होते. मात्र, बीएसएनएल कंपनी सतत तोट्यात येत असल्याने बिल मंजूर होऊन येत नव्हते. यामुळे सोलवट यांची आर्थिक कोंडी निर्माण होत होती.  
अधिका-यांना निवेदन देऊनही बिल निघत नसल्याने सोलवट त्रस्त झाले होते. या नैराश्यातून त्यांनी काही दिवसांपूर्वी बीएसएनएल कार्यालयातील अधिकाऱ्यांसह जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे आत्मदहनाचा इशारा दिला होता. मात्र, याकडे कोणीच लक्ष दिले नाही. यामुळे त्यांनी मंगळवारी (दि.17) सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास सर्व बोलेरो वाहने बीएसएनएल कार्यालयात उभा करून टावरवर चढून आत्मदहनाचा प्रयत्न केला. दरम्यान बीएसएनएल कार्यालयातील अधिकाऱ्यांनी सोलापूर व मुंबई येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून माहिती दिली. त्यावेळी 15 दिवसांत बिल काढण्याचे लेखी आश्वासद देण्यात आले. त्यानंतर दिलीप सोलवट यांना खाली उतरवण्यात आले.

 
Top