उस्मानाबाद/प्रतिनिधी-शहरातील नागरिकांनी जिल्हाधिका-यांना निवेदन देऊन देखील शहरातील प्रमुख रस्त्यावर अनेक जनावरे फिरत असल्यामुळे अनेकांचे अपघात झाले. न.प.ने कारवाई करून देखील जनावरांच्या मालकाने परत-परत रस्त्यावर सोडणा-या जनावरा बाबत न.प.च्या सभेत चर्चा झाली. झालेल्या या चर्चेत नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर, उपनगराध्यक्ष सूरज साळूंके, विषय समितीचे सभापती शिवाजी पंगुडवाले, सिध्देश्वर कोळी, अभय इंगळे, माणिक बनसोडे, मुख्याधिकारी बाबासाहेब मनोहरे यांनी चर्चा करून पुढील काळात रस्त्यावर फिरणा-या जनावरांच्या मालकावर गुन्हा नोंद करण्याचा ठराव मान्य करण्यात आला.
उस्मानाबाद नगर पालिकेची सर्वसाधारण सभा गुरूवार दि.१९ सप्टेंबर रोजी दुपारी संपन्न झाली. या सभेस एकुण १४ विषयांना मंजुरी देण्यात आली. रूईभर व तेरणा जलशुध्दीकरण जल प्रकल्पासाठी दोन केमिस्ट नेमणे, अमृत अभियानांतर्गत पाणी पुरवठा योजना व स्थापत्य कामास मुदतवाढ मिळणे, आवश्यकतेनुसार संगणक ऑपरेटर घेणे, नवीन सबमसिंबल पंप व त्यासाठी लागणारे साहित्य पुरवठा करणे, विंधन विहिरीमध्ये आडकलेले पंप बाहेर काढणे, शहरातील मुख्य चौका मधील सिंग्नलची वार्षीक देखभग करणे, अग्निशामन दलासाठी नवीन गाडया घेणे, छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहचे अद्यावतीकरण करण्यासंदर्भात विचार करणे आदी विषयावर बैठकीत चर्चा करण्यात आली. या बैठकीत जन्म-मृत्यू प्रमाणपत्र व अन्य प्रमाणपत्र देताना चुका टाळण्याची मागणी नगरसेवकांनी केली. यावेळेस शिवाजी पंगुडवाले यांनी एकदा चुका करून प्रमाणपत्र दिल्यानंतर ते लगेच दुरूस्त करून देणे आवश्यक आहे, अशी मागणी केली. रस्त्यावर फिरणा-या जनावरांच्या मालकांवर अज्ञाताच्या नावावर गुन्हे नोंद करून जनावरे कोंडवाडयात घाला, अशी मागणी केली. शहर पोलिस ठाणे ते बार्शी नाका या दरम्यान जे लाईटचे पोल वाकलेले आहेत अथवा कुजलेले आहेत ते त्वरीत काढण्याचे आदेश नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर यांनी दिले.यावेळी नगर सेवकांनी यापुर्वीपण मागणी करून देखील काम झाले नसल्याचे सांगितले. सिंग्नलसंदर्भात बोलताना नगराध्याक्षानी खर्च करून सिंग्नलदुरूस्त करून कुलूप लावून त्यांच्या ताब्यात दिले असताना देखील सिंग्नल चालु केले जात नसल्याचे सांगितले. तर माणिक बनसोडे यांनी सिंग्नल चालू करण्यात पोलिसांचा हलगर्जीपणा असल्याचे सांगितले. यावेळी बैठकीत एक पाईप टाकलेला असताना दोन पाईप टाकले गेले असल्याची बिले नगरसेवक शिवाजी पंगुडवाले यांनी नगराध्यक्षांच्या नजरेस आणून दिले.यावर नगराध्यक्षांनी बोगस बिले लावू नका, अशा शब्दात संबंधित कर्मचा-यास झापले.