उस्मानाबाद/प्रतिनिधी-इमारतीचे बांधकाम करत असताना दुसर्या मजल्यावरून कोसळल्याने गंभीर जखमी झालेल्या मजुराच्या मणक्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्यामुळे मजुराच्या कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे. उस्मानाबाद येथील अंजुमन हेल्थकेअर फाऊंडेशनच्या पुढाकारातून सोलापूर येथील प्रसिद्ध स्पाइन सर्जन डॉ. प्रवीण सारडा यांनी ही शस्त्रक्रिया केली. त्यामुळे बांधकाम मजूर महमूद शेख यांना जगण्याची उमेद मिळाली आहे.
उस्मानाबाद तालुक्यातील वरवंटी येथील महमूद शेख (वय 50) हे बांधकाम मजूर असून त्यावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. एका इमारतीच्या बांधकामाचे प्लास्टर करत असताना दुसर्या मजल्यावरून अचानक कोसळल्याने त्यांच्या मणक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांच्या नातेवाईकांनी उस्मानाबाद येथील एका खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु शस्त्रक्रियेसाठी तब्बल एक लाख रूपयांचा खर्च येणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितल्यामुळे शेख कुटुंबियांसमोर पैशाचा प्रश्न निर्माण झाला. दरम्यान, अंजुमन हेल्थकेअर फाऊंडेशनचे संस्थापक फेरोज पल्ला यांची शेख यांच्या नातेवाईकांनी घेऊन मदत करण्याची विनंती केली. त्यावर फेरोज पल्ला यांनी सोलापूर येथील प्रसिद्ध सर्जन डॉ. प्रवीण सारडा यांच्याशी संपर्क साधून रूग्णाची हलाखीची परिस्थिती असल्यामुळे आपणच मार्ग काढावा, अशी विनंती केली. अखेर डॉ. प्रवीण सारडा यांनी सदरील रूग्णावर महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून शस्त्रक्रिया होऊ शकते काय, याची माहिती घेऊन शेख यांना सोलापूर येथील रूग्णालयात दाखल करण्यास सांगितले. सोलापूर येथील गंगामाई हॉस्पिटलमध्ये डॉ. सारडा यांनी शेख यांच्या मणक्यावर यशस्वी शस्त्रक्रिया केली. आता शेख यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे. अंजुमनच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या रूग्णसेवेच्या कार्यासाठी नेहमीच धावून येणारे डॉ. प्रवीण सारडा यांचा फेरोज पल्ला यांनी सत्कार करून आभार व्यक्त करण्यात आले. यावेळी फाऊंडेशनचे पदाधिकारी उबेद शेख, सरफराज पटेल, गजानन पाटील, गंगामाई हॉस्पिटलचे फिजिओथेरपिस्ट डॉ. आवेज आदी उपस्थित होते.