उमरगा (माधव सुर्यवंशी)
उमरगा -लोहारा विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जाती साठी आरक्षित असल्यामुळे मतदारसंघात इच्छुकां ची संख्या मोठी आहे. मतदार संघातील शिवसेनेचे आमदार ज्ञानराज चौगुले गेली दोन टर्म तालुक्याचे नेतृत्व करीत आहेत.
गेल्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसचे किसन कांबळे यांचा पराभव केला असून येणाऱ्या निवडणूकीत विजय मिळवून हॅट्रीक साधण्याच्या दृष्टीने प्रचाराची रणनीती आखण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. गेल्या वीस वर्षापासून खरी लढत काँग्रेस व शिवसेना यांच्यातच राहिली आहे. यंदाहि विद्यमान आमदार असल्यामुळे चौगुले यांची उमेदवारी निश्चित मानली जात असली तरी सावंत गटाकडून ही सक्षम उमेदराचा शोध सुरू असून त्यात ते यशस्वी होतील की नाही हे पाहावे लागणार आहे.
माजी खासदार रविंद्र गायकवाड यांचे मतदार संघावर वर्चस्व राहिले आहे. शिवाय आमदार चौगुले यांनी गेल्या दहा वर्षात केलेल्या विकास कामाची जोड व जातीय समीकरण त्यांच्यासाठी फायद्याचे ठरणारे आहेत. गेल्या पाच वर्षात स्थानिक स्वराज्य संस्थेत कॉंग्रेसने भाजपच्या मदतीने यश मिळविले असले तरी विधानसभा निवडणूकीत चित्र वेगळे असणार आहे. युती न झाल्यास भाजप कडून कैलास शिंदे यांचे नाव अग्रस्थानी आहे. शिवाय कॉंग्रेस, राष्ट्रवादी मधील एक गट कैलास शिंदे व आमदार ज्ञानराज चौगुले यांना मदत करण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
जिल्ह्याचे पालकमंत्री शिवसेनेचे असल्याने व स्वत:चे राजकीय वजन वापरून आमदार चौगुले यांनी मतदारसंघात निधी मंजूर करून कामे केली आहेत. कॉंग्रेस कडून इच्छुकांची यादीही खूप मोठी असून त्यात जालिंदर कोकणे, दिलीप भालेराव, विजय वाघमारे, अशोक सरवदे यांनी उमेदवारीवर दावा केला असून गावनिहाय प्रचारहि सुरू केला आहे, मात्र अखेरच्या क्षणी कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष तथा औश्याचे आमदार बसवराज पाटील कोणाला प्रथम प्राधान्य देणार यावर सर्व काही अवलंबून आहे. वंचित आघाडी मुळे दलित, मुस्लिमां सह अन्य छोटे समूह एकत्र आल्यास सर्वाधिक फटका कॉंग्रेसला बसण्याची शक्यता अधिक आहे. लोकसभा निवडणूकीत दुरावलेले कार्यकर्ते व युवक मतदार यामुळे  अनेकाचे अस्तित्व पणाला लागणार हे मात्र निश्चित आहे.
संभाव्य उमेदवार!
महायुती कडून आमदार ज्ञानराज चौगुले यांची उमेदवारी निश्चित असून युती नाही झाल्यास जिल्हा बॅंकेचे उपाध्यक्ष कैलास शिंदे भाजपचे उमेदवार असण्याची शक्यता आहे. कॉंग्रेस कडून जालिंदर कोकणे, दिलीप भालेराव यांच्यात स्पर्धा सुरू आहे. वंचित आघाडी कडून डॉ सुभाष वाघमारे, रामभाऊ गायकवाड, डॉ चंद्रकांत गायकवाड हि नावे चर्चेत आहेत.
विधानसभा मतदारसंघ!
एकुण मतदार - दोन लाख 95 हजार 742
पुरूष- एक लाख 56 हजार 777 तर महिला- एक लाख 38 हजार 305, दिव्यांग- 1209, इतर- दोन. 
 
Top