धाराशिव/तुळजापूर 

पेट्रोल पंपावर आलेल्या ग्राहकांना पंपधारकांनी शासनाने ठरवून दिलेल्या आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे. परंतु धाराशिव व तुळजापूर शहरातील बहुतांश पेट्रोल पंपावर हवा भरण्याची सुविधा इंधन भरणाऱ्या वाहन चालकांना  दिली जात नसल्याने दहा रुपयांचा भुर्दंड सोसून दुचाकीच्या चाकांमध्ये हवा भरावी लागत आहे. याकडे पुरवठा अधिकाऱ्यांनी  लक्ष घालून दुचाकी चालकांना सुविधा न देणाऱ्या पेट्रोलपंप चालकांवर कारवाई करण्याची मागणी वाहनधारकांमधून होत आहे.

शहरातील अनेक पेट्रोल पंपावर हवा भरण्यासाठी कर्मचारी नसल्याचे सांगून वाहनांमध्ये हवा भरण्यास टाळाटाळ केली जाते. त्यामुळे पेट्रोल पंपावर हवा भरण्याची यंत्रणा केवळ पुरवठा अधिकाऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक करण्यासाठीच  असल्याचे बोलले जात आहे. त्याचप्रमाणे बऱ्याच पेट्रोल पंपावर स्वच्छतागृह व पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था नाही. 

धाराशिव व तीर्थक्षेत्र तुळजापूर येथेही पेट्रोल पंप मोठ्या संख्येने आहेत. येथे पेट्रोल भरण्यासाठी शहरासह तालुक्यातील नागरिक आणि दुचाकीवरुन देवी दर्शनासाठी आलेले भाविक पैसे देऊन पेट्रोल भरतात. मात्र हवा भरण्याच्या यंत्राजवळ गेले की तेथील कर्मचारी बाहेर गेला आहे, वेळ लागेल असे सांगून टाळाटाळ करण्याचे प्रकार  वाढले आहेत. त्यामुळे पेट्रोल पंपांवर आवश्यक त्या सुविधा उपलब्ध ठेवण्याच्या सूचना पुरवठा अधिकाऱ्यांनी द्याव्यात अशी मागणी केली जात आहे.


 
Top