वाशी/प्रतिनिधी-
मला कोणतीही सबब सांगू नका, जनता दरबार काय शो नव्हता, तुम्हाला वाटले मी पुन्हा येणार नाही, आता ही शेवटची संधी आहे. शुक्रवारपर्यंत पीककर्जाच्या प्रकरणांचा निपटारा करा नाहीतर कर्मचाऱ्यांच्या नावासह बँकेवर गुन्हे दाखल करेन, असा इशारा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. तानाजी सावंत यांनी बँकांना दिला.
पीककर्ज प्रकरणाबद्दल दि.22 रोजी झालेल्या जनता दरबारात आलेल्या तक्रारींचे निवारण न झाल्यामुळे शनिवारी (दि.31) वाशी येथील महाराष्ट्र ग्रामीण बँक व भारतीय स्टेट बँक या दोन्ही बँकांमध्ये स्वत: जाऊन तक्रारदार शेतकरी, व्यापारी व तरुणांच्या तक्रारीवरून बँक कर्मचा-यांना चांगलेच धारेवर धरले. यावेळी एसबीआय ठेवींबद्दल विचारणा करून मिळालेल्या 125 कोटीच्या आकडेवाडीनुसार किमान 75 टक्के कर्जवाटप करण्याची सूचनाही मॅनेजर अमित ओव्हाळ यांना केली. यावेळी मराठा तरुणांसाठी असलेल्या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातील प्रकरणे, शैक्षणिक कर्ज नियमानुसार मंजूर करून अडवणूक न करण्याची सूचना केली. त्यांच्यासमवेत माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील, लीड बँकेचे मॅनेजर निलेश विजयकर, जिल्हा उपनिबंधक विश्वास देशमुख, झेडपी सदस्य धनंजय सावंत, उद्धव साळवी, जिल्हा प्रमुख गौतम लटके, केशव सावंत, बाळासाहेब मांगले, तालुका संघटक शिवहार स्वामी, शहरप्रमुख सतीश शेरकर, दयानंद कवडे, राहुल कवडे, बाळासाहेब मोळवणे, विलास शेरकर, नानासाहेब कवडे, अनिल शेरकर यांच्यासह शेतकरी, तरुण व्यापारी उपस्थित होते. 
 
Top