उस्मानाबाद/प्रतिनिधी- अनेक नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागत असला तरी आपल्या जिल्ह्यात जगाला आकर्षित करू शकतील, अशी अनेक बलस्थाने आहेत. आगामी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने जिल्ह्याच्या विविध क्षेत्रातील हा अमूल्य ठेवा जगासमोर मांडण्याची संधी उपलब्ध झाली आहे. सकारात्मक प्रयत्नांच्या बळावर हे संमेलन आपण सर्वजण मिळून यशस्वी करूया, अशा शब्दात जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. 
जानेवारी 2020 मध्ये उस्मानाबाद शहरात 93 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होऊ घातले आहे. शनिवारी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांच्या हस्ते संमेलनाच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नेताजी पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते, पोलीस उपाधीक्षक अंजुम शेख, मराठवाडा साहित्य परिषदेच्या उस्मानाबाद शाखेचे अध्यक्ष नितीन तावडे यांची उपस्थिती होती. 
मराठवाडा साहित्य परिषदेच्या पदाधिकार्‍यांनी मोठ्या प्रयत्नाने हे संमेलन मिळविले आहे. ते यशस्वी करण्याची जबाबदारी आता जिल्हावासीयांवर आहे. जिल्हा प्रशासनाची प्रमुख या नात्याने संमेलन अभूतपूर्व व्हावे याकरिता सर्व पातळीवर मदत करण्यास आपण तयार आहोत. त्यातून अनेकांना प्रेरणा मिळतील. त्याकरिता सर्वांनी संमेलनाच्या आयोजनात आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी मुधोळ-मुंडे यांनी केले. 
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते यांनीही, संमेलनाच्या आयोजनासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे सांगितले. पोलीस प्रशासन हे संमेलन यशस्वी होण्याकरिता आपल्यापरिने सर्वतोपरी सहकार्य करील, अशी भावना अंजुम शेख यांनी व्यक्त केली. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नेताजी पाटील यांनी संमेलन आपल्या सर्वांचे आहे. त्यासाठी आपण सर्वांनी झोकून देवून काम करायला हवे, अशी भावना व्यक्त केली. 
प्रारंभी प्रास्ताविकपर मनोगतात नितीन तावडे यांनी संमेलन उस्मानाबादला मिळावे, याकरिता मागील आठ वर्षांपासून घेतलेल्या परिश्रमाची माहिती सर्वांसमोर विषद केली. राज्याच्या साहित्य आणि सांस्कृतिक इतिहासात हे संमेलन मानदंड, असे आयोजन सर्वांच्या सहकार्यातून केले जाईल, असे तावडे यांनी नमूद केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. प्रशांत चौधरी यांनी तर आभार हणुमंत पडवळ यांनी मानले. कार्यक्रमास शहर आणि परिसरातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. 
 
Top