उस्मानाबाद/प्रतिनिधी-कौडगाव एमआयडीसीत 50 मेगावॅट क्षमतेचा अडीचशे कोटी रुपयांचा सोलार प्रकल्प उभारण्यात येत आहे. याच्या भूमिपूजनाला मी यावे अशी मागणी असली तरी आचारसंहितेपूर्वी याचे भूमिपूजन उरकून घ्या. तसेच उस्मानाबादला टेक्सटाइल हब निर्मितीचा माझा मानस असून याचीही निर्मिती लवकरच केली जाईल, असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उस्मानाबादकरांना दिले.मुख्यमंत्री फडणवीस उस्मानाबाद शहरातील मल्टिपर्पज ग्राऊंडवर आयोजित महाजन संवाद यात्रेनिमित्त सभेत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जलसंपदा व वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन, भाजपचे प्रदेश सरचिटणीस तथा आमदार सुजितसिंह ठाकूर, कामगार मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर, खासदार डॉ. प्रकाश महात्मे, आमदार सुरेश धस, जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, नितीन काळे, अॅड. मिलिंद पाटील, प्रतापसिंह पाटील, रोहन देशमुख, योगेश केदार, कैलास शिंदे, संजय गाढवे, अॅड. नितीन भोसले, अॅड. अमित मुंडे यांच्यासह भाजपचे जिल्हाभरातील पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, मराठवाड्यातील दुष्काळ हटविण्यासाठी ग्रीड योजना हाती घेतली आहे. याअंतर्गत 65 हजार किलोमीटरची जलवाहिनी अंथरून मराठवाडातील शहरे व गावांना पिण्याचे पाणी पुरविण्यात येईल. यानुसार औरंगाबाद व जालनाची निविदा निघाली असून आचारसंहितेपूर्वी लातूर व उस्मानाबादचीही निविदा जाहीर होईल. तसेच भीमा स्थिरीकरण योजनेंतर्गत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी भरीव काम केले आहे. 1400 कोटींचा निधी दिला. जेऊर व सीना बोगद्याचे काम डिसेंबरपूर्वी पूर्ण करण्यासाठी सकाळीच सचिवांची बोलणे झाले आहे. तसेच कोकणामधून समुद्रात वाहून जाणारे 164 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळविण्यासाठी मंजूरी दिली आहे. यामध्ये 25 टीएमसीचा आराखडा तयार करण्यात आला आहे असेही त्यांनी सांगितले. जिल्ह्यात पाडोळी येथे अॅड. व्यंकट गुंड यांच्यावतीने त्यांचे स्वागत झाले. तर दुचाकी रॅलीने व ढोल पथकाच्या निनादात मुख्यमंत्री सभास्थळी दाखल झाले.