जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघापैकी परंडा आणि तुळजापूर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी या महिला असून, जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अर्थातच जिल्हाधिकारी महिलाच आहेत. शिवाय तहसीलदार दर्जाच्या सहायक निवडणूक निर्णय अधिका-यांमध्येही महिला अधिका-यांचा समावेश असल्याने विधानसभेच्या निवडणुकीची प्रक्रिया ही महिला अधिका-यांच्या माध्यमातून होत आहे. लोकशाहीच्या दृष्टीने ही समाधानकारक बाब मानली जात आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाच्या धोरणानुसार महिला कर्मचा-यांचा मतदान प्रक्रियेत सहभाग वाढावा, यासाठी लोकसभेपासून सखी मतदान केंद्र सुरू करण्यात आली आहेत.त्यानुसार यावेळीही चार मतदारसंघात 8 सखी केंद्र असतील.
जिल्हाधिकारी दीपा मुंडे यांनी पत्रकारांना ही माहिती दिली. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे, अप्पर पोलिस अधीक्षक संदीप पालवे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. प्रताप काळे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी दीपा मुधोळ म्हणाल्या, चार विधानसभा मतदारसंघात एकूण 1491 मतदान केंद्र असतील. त्यात उस्मानाबादमध्ये 407, तुळजापूरमध्ये 400, उमरग्यात 315 आणि परंडयात 369 मतदानकेंद्रांचा समावेश आहे. दिव्यांग कर्मचा-यांचे प्रत्येक मतदारसंघात प्रत्येकी एक मतदान केंद्र असेल. तर चारही मतदारसंघात सर्व सुविधांसह आदर्श मतदान केंद्र उभारण्यात येणार आहेत. प्रत्येक मतदानकेंद्रावर पिण्यासाठी पाणी, स्वच्छतागृहासह दिव्यांग मतदारांसाठी व्हील चेअर, अंध मतदारांसाठी ब्रेल लिपीतील मतपत्रिका पुरविण्यात येणार आहेत. मतदारसंघातील निवडणूक प्रक्रियेची तयारी सुरू झाली असून, व्हीव्हीपॅट, बॅलेट युनिट आणि कंट्रोल युनिटची उपलब्धता झाली आहे. 15 पेक्षा अधिक उमेदवार असल्यास दोन मशिन वापरण्यात येतील. चार मतदारसंघात एकूण 13 लाख, 14 हजार, 240 मतदार असून,निवडणूक प्रक्रियेसाठी 11 हजार, 546 कर्मचारी उपलब्ध आहेत. लोकसभेप्रमाणेच यावेळी सी-व्हिजल अॅपद्वारे आचारसंहितेसंबंधी किंवा निवडणुकीसंबंधी तक्रारी नोंदविता येतील. तसेच 1950 या टोल फ्री क्रमांकावर चोवीस तास आपली तक्रार नोंदविता येईल. यावेळी उमेदवारांना 28 लाख रुपये इतकी निवडणुकीतील खर्च मर्यादा घालून देण्यात आली असून, या खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी पथकांची नेमणूक करण्यात येणार आहे. निवडणुकीनंतर 30 दिवसांत खर्चाचा तपशील उमदेवारांना सादर करावा लागेल.मतदानकेंद्रावर लोकसभेप्रमाणेच आशा कार्यकर्तींची मदत घेण्यात येणार आहे शिवाय 10 टक्के मतदानकेंद्रावर वेबकास्टिंग करण्यात येणार आहे. यावेळी मतपत्रिकेवर उमेदवारांच्या नावासह छायाचित्र प्रसिद्ध केली जाईल.