प्रतिनिधी / उमरगा-उमरगा येथील राष्ट्रीय महामार्गावरील बायपासजवळ असलेले टायरचे दुकान फोडून चोरट्यांनी ३ लाख २३ हजार रुपयांचे टायर चोरून नेले होते. याप्रकरणाचा उमरगा पोलिस व स्थानिक गुन्हे विभागाने ४८ तासात छडा लावत एका आरोपीला अटक करत त्याच्याकडून २ लाखांचे टायर जप्त केले आहेत तर दोघे फरार आहेत. 
उमरगा येथील राष्ट्रीय महामार्ग वळण रस्त्यावर हॉटेल सोनाई शेजारी असलेल्या चक्रा टायर दुकानात चोरट्यानी दि. ५ ऑगस्टच्या रात्री चोरी करून दुकानातील वेगवेगळ्या कंपनीचे ट्रक्टर, ट्रक, दुचाकीचे ४३ टायर (किंमत ३ लाख २३ हजार रुपये ) चोरून नेले होते. याप्रकरणी दुकान मालक महेश कोराळे यांच्या फिर्यादीवरून उमरगा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. तपासात परिसरातील एका हॉटेलच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता आरोपींचा सुगावा लागला. पथकाला चोरटे निलंगा तालुक्यातील सरवडी येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार गुरूवारी पथकाने कारवाई करून आरोपी विक्रम उर्फ पप्प्या लालू जाधव (रा. आनंदवाडी) यास अटक केली. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली जीप (एम एच १४ एएच ५८४) जप्त करून चोरीतील २३ टायर जप्त केले. अन्य दोन आरोपी अद्याप फरार आहेत. पकडण्यात आलेला विक्रम जाधव सराईत गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले आहे. 

 
Top