प्रतिनिधी /उस्मानाबाद-
जिल्ह्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्पासाठी भरीव निधीची तरतूद करण्याचा निर्णय राज्य शासनाने बुधवारी घेतला असून, या निर्णयाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी स्वागत करून मुख्यमंत्री, जलसंपदा मंत्र्यांचे आभार मानले आहेत.आपण केलेल्या पाठपुराव्याला यश आल्याचा दावा त्यांनी केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सतीश दंडनाईक यांनी म्हटले आहे की, आमदार पाटील यांनी मागील महिन्यात मुख्यमंत्री व जलसंपदा मंत्री यांना भेटून या प्रकल्पाबाबत बैठक घेऊन योजनेतील अडथळे दूर करण्याची व या प्रकल्पासाठी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेप्रमाणे दरवर्षी 1200 कोटी रुपये उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. या मागणीला यश आले असून बुधवारी झालेल्या मंत्री मंडळाच्या बैठकीमध्ये मराठवाड्यातील 7 प्रकल्पासाठी 3380. 89 कोटी नाबार्डकडून कर्ज घेण्याच्या प्रस्तावास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. जिल्ह्यातील वाढत्या आत्महत्त्या रोखण्यासाठी व येथील शेतकऱ्याचे जीवनमान उंचावण्यासाठी कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्प पूर्ण करणे अत्यावश्यक आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्यातील 52 पाटबंधारे प्रकल्पासाठी 15000 कोटींचे कर्ज घेण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. यामध्ये मराठवाड्यातील 7 प्रकल्पासाठी 3380.89 कोटी रुपये प्रस्तावित करण्यात आले आहेत. कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्प लिंक-5 साठी 870 कोटी तर कृष्णा-मराठवाडा पाटबंधारे प्रकल्प उपसा सिंचन योजना 1, 2 व 3 साठी 2302 कोटी रुपये तर इतर साठवण तलाव व अनुषंगिक कामासाठी 208 कोटी रुपये प्रस्तावित करण्यात आले आहेत. सदर कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी जलसंपदा विभाग, नियोजन विभाग व वित्त विभाग वित्तीय संस्था निश्चित करणार आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी हा मोठा दिलासा देणारा निर्णय आहे. या प्रकल्पासाठी शासनाकडून अत्यल्प निधी दिला जात होता. भरीव निधीच्या तरतूदीसह कालमर्यादा ठरवून हा प्रकल्प पूर्ण करावा यासाठी राज्याच्या महामहीम राज्यपाल यांचीही आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी शिष्टमंडळासह भेट घेतली होती. सरकारला जिल्ह्यातील 1 लाख शेतकऱ्यांच्या सह्यांचे निवेदन दिले होते.
विधीमंडळ, जलसंपदा मंत्री, मुख्यमंत्री यांच्या स्थरावर त्यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले आहे. या उपर देखील या प्रकल्पासाठी आवश्यक असणारा अधिकचा निधी राज्य शासनासह केंद्र शासनाकडून मिळविण्यासाठी पाठपुरावा सुरुच राहणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे रखडलेल्या कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाला गती मिळणार असून तो लवकर पूर्ण होण्याची आशा निर्माण झाली आहे.यामुळे या भागातील लाखो हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. परिणामी याभागातील शेतकऱ्यांच्या जीवनात मोठा बदल घडणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी या प्रकल्पाच्या यादीत उस्मानाबाद जिल्ह्यासाठी महत्वाचा असणा-या कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प समाविष्ट केल्याबद्दल जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या वतीने आ.राणाजगजीतसिंह पाटील यांनी त्यांचे आभार मानले आहेत. 
 
Top