उस्मानाबाद/प्रतिनिधी -भारतीय जनता पार्टीच्या महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने उस्मानाबादेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा आयोजित करण्यात आली आहे. जिल्हा परिषद कन्या शाळेच्या प्रांगणात होणारी ही सभा भाजपच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची असून, यानिमित्ताने पक्षाकडून भव्य शक्तीप्रदर्शन करण्यात येणार आहे. जिल्ह्यात भाजपची वाढलेली ताकद यातून दाखविण्याचा प्रयत्न होणार आहे, अशी माहिती भाजपा जिलाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांनी दिली. भाजपच्या महाजनादेश यात्रेचे नियोजन उस्मानाबादचे सुपूत्र आमदार सुजितसिंह ठाकूर करत आहेत.
कन्या शाळेच्या प्रांगणात होत असलेल्या या सभेची पक्षाकडून जोरदार तयारी सुरू आहे. आठ दिवसांपासून मंडप उभारणी आणि मैदानाची स्वच्छता सुरू आहे. दुपारी 3 वाजता होणारी ही सभा ऐतिहासि ठरेल, असे सांगितले. या सभेला अंदाजे 10 हजारावर भाजपचे कार्यकर्ते उपस्थित राहतील, असे भाजपा नेते प्रतापसिंह पाटील यांने सांगितले.
जिल्ह्यात भाजपचे स्थान नगण्य मानले जात होते. शिवसेनेकडून कायम गृहित धरलेल्या या पक्षाला स्वतंत्र अस्तित्व तयार करण्यात यश आले आहे, असे मत भाजपा प्रदेश कार्यकारी सदस्य नितीन काले यांनी व्यक्त केले आहे. गेल्या काही वर्षात भाजपची स्वतंत्र यंत्रणा तयार झाली असून, गेल्या लोकसभा निवडणुकीत स्वबळावर लढण्याएवढी बुथपर्यंतची व्यवस्था पक्षाने केली आहे. किंबहुना शिवसेनेकडेही इतक्या व्यापक स्वरूपात नियोजन नव्हते. त्यामुळे काही वर्षापूर्वी नगण्य स्थान असलेल्या भाजपने जिल्ह्यात आता मोठी यंत्रणा उभारली असून, या यंत्रणेच्या माध्यमातून भाजपची उभी राहीलेली ताकद मुख्यमंत्र्यांसमोर दाखविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे., अशी माहिती भाजपा कार्यकारणी सदस्य एड. व्यंकटराव गुंड यांनी दिली. लातूरमार्गे पाडोळी, सारोळा, जिल्ह्यात भाजपची महाजनादेश यात्रा येणार असून, यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रबिंदू असतील, असे भाजपा कार्यकारणी सदस्य एड. अनिल काळे यांनी सांगितले.