उस्मानाबाद,/प्रतिनिधी- उस्मानाबाद-तुळजापूर-सोलापूर रेल्वेमार्गाचे काम प्रगतीपथावर असून या कामासाठी निधीची कमतरता भासणार नाही. या रेल्वेमार्गाचे अंतिम सर्वेक्षण लवकरच पूर्ण होणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाच्यावतीने मध्य रेल्वेचे मुख्य प्रबंधक ए. के. गुप्ता यांनी दिली. 
पुणे येथे बुधवार, 28 ऑगस्ट रोजी सोलापूर व पुणे रेल्वे विभागातील रेल्वे समस्यांसंदर्भात विविध विषयांवर विचार, विनिमय घेण्यासाठी खासदारांची बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठकीत उस्मानाबादचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी आपल्या मतदार संघातील रेल्वेसंदर्भातील विविध मागण्या मांडल्या. तर काही मागण्या मान्यही करून घेतल्या. 
या बैठकीत महत्वाच्या समजल्या जाणार्‍या उस्मानाबाद-तुळजापूर-सोलापूर रेल्वेमार्गाचा विषय खासदार राजेनिंबाळकर यांनी आग्रहाने मांडला असता, या मार्गाचे अंतिम सर्वेक्षणाचे काम सुरू असून ते लवकरच  पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर भूसंपादन करून प्रत्यक्ष कामास सुरूवात होईल. काम जसजसे पूर्ण होईल, तसतसे निधीची उपलब्धता होणार आहे. खासदार राजेनिंबाळकर यांनी रेल्वे संबंधीच्या इतर मागण्या या बैठकीत मांडल्या. उस्मानाबाद रेल्वे स्थानकावर कोच इंडिकेटर बसविण्यास मान्यता देण्यात आली. तसेच लातूर येथील पीटलाईन व लातूर रोड ते कुर्डूवाडी या मार्गाचे विद्युतीकरण आग्रक्रमाने पूर्ण करण्यात यावे, या मागणीस मान्यता देण्यात आली. हेे काम पूर्ण झाल्यानंतर पुणे-हैद्राबाद रेल्वेगाडी दररोज करणे, लातूर रोड ते कुर्डूवाडी डेमूकार चालविणे तसेच इतर काही नवीन गाड्या सुरू करता येतील, असे रेल्वेप्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले. 
खासदार राजेनिंबाळकर यांनी कळंब रोड किंवा ढोकी स्थानकावर एक्सप्रेस रेल्वेगाड्यांच्या थांब्याबाबत प्राधान्याने विचार करण्याची सूचना केली. या व गुड्स प्लॅटफार्मसह इतर मागण्यांबाबत रेल्वे प्रशासन सकारात्मक असून येत्या काळात ही सर्व कामे पूर्ण होतील, असे सांगण्यात आले. 
यावेळी रेल्वे उपभोक्ता समितीचे सदस्य संजय मंत्री, उदगीर रेल्वे समितीचे मोतीलाल डोईजोडे, लातूरचे श्यामसुंदर मानधना यांच्यासह रेल्वे प्रशासनातर्फे मध्यरेल्वेचे मुख्य प्रबंधक ए. के. गुप्ता, मुख्य परिचालन प्रबंधक डी. के. सिंग, मुख्य वाणिज्य प्रबंधक दादा भॉय यांची प्रमुख उपस्थिती होती. तर सोलापूर विभागाचे प्रबंधक हितेंद्र मल्होत्रा, वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक प्रदीप हिरडे, परिचालन प्रबंधक प्रवीणचंद्र वंजारी आदी उपस्थित होते. 
 
Top