उस्मानाबाद/प्रतिनिधी -तालुक्यातील नितळी येथील जयलक्ष्मी शुगर या कारखान्याकडे २०१८-१९ या साली शेतक-यांनी गाळपासाठी ऊस घातला मात्र त्याचे अद्यापर्यंत बील देण्यात आलेले नाही. सदरील उसाचे बील द्यावे यासाठी वारंवार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन, निदर्शने करण्यात आली. मात्र अद्याप ही संबंधित शेतक-यांचे बील कारखान्याने अदा केलेले नाही ते या मागणीसाठी शिवसेनेचे तालुका सरचिटणीस दिपक जाधव यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा दि. २७ ऑगस्ट पासून अमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. दिलेल्या निवेदनात, असे नमुद करण्यात आले आहे की, जयलक्ष्मी शुगर या कारखान्याने ज्या शेतक-यांचा ऊस गाळपासाठी नेला त्यांना बिलापोटी चेक दिले गए मात्र बॅंकेत शिल्लक रक्कम नसल्यामुळे ते वटले नाहीत, या संदर्भात जिल्हाधिका-यांना देखील वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली गेली आहे, मात्र अद्याप यावर कोणताच तोडगा काढलेला नाही व त्यातच दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे शेतक-यांना आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. हक्काचे पैसे मिळत नसल्यामुळे शेतक-यांवर उपासमारीची वेळ आली असून त्यांनी आत्महत्या करण्यासाठी पर्यायच उरला नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने याचे गांर्भिय ओळखून तात्काळ, बिलाची रक्कम देण्यास कारखान्यास भाग पाडावे, अशी मागणीही करण्यात आलेली आहे. या अमरण उपोषणामध्ये हनुमंत शिंदे, रामरतन मारकळ, आश्रुबा डोंगरे, भास्कर कुलकर्णी, शेषेराव शिंदे, महिला रयत संघटनेच्या अध्यक्षा सोनाली शिंदे, कुसूम इंगळे, मंगल केंद्रे, उध्दव बोबडे, बाळु शिंदे, नारायण डोंगरे, आश्रुबा शिंदे, नारायण खोत यांच्यासह संबंधित शेतकरी मोठया संख्येने सहभागी आहेत. या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे.
