उस्मानाबाद /प्रतिनिधी :- ढोकी ता.उस्मानाबाद येथील जामा मस्जिदच्या मालकीची गट नं.९६ क्षेत्र २१ हेक्टर ६१ आर जमीन आहे. गावातीलच बुऱ्हानोद्दीन जहिरोद्दीन काझी व त्यांच्या पत्नी सिद्दीका बेगम काझी यांनी बेकायदेशीरपणे तत्कालीन तलाठी, मंडळ अधिकारी यांच्याशी संगनमत करून देवस्थानच्या नावे असलेली जमीन स्वतःच्या नावे करून घेतली होती. सदर प्रकरणातील बेकायदेशीर हस्तांतर झाले असल्याचे जमिनीचे वंशपरंपरागत इनामदार वाजीद खुददुस काझी यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी सदर प्रकरणाचे अपील मा.उपविभागीय अधिकारी उस्मानाबाद यांच्या न्यायालयात दाखल केले होते. दि.१९.०८.२०१९ रोजी मा.उपविभागीय अधिकारी उस्मानाबाद यांनी सदरील प्रकरणाचा निकाल दिला असून बेकायदेशीर खरेदी विक्री फेरफार क्र.७९५ रद्द करून जमीन पूर्ववत देवस्थानच्या मालकीची करण्याचा महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. इनामी जमिनीची बेकायदेशीरपणे खरेदी विक्री करणाऱ्यावर कायदेशीर कार्यवाही करावी असा देखील आदेश मा.उपविभागीय अधिकारी, उस्मानाबाद यांनी जिल्हा वक्फ अधिकारी,उस्मानाबाद यांना दिला असून त्यामुळे संबंधितांचे धाबे दणाणले आहेत. यासाठी गेल्या अनेक वर्षापासून लढा देत असलेले जमिनीचे वंशपरंपरागत इनामदार वाजीद खुददुस काझी यांच्या प्रयत्नास यश आले आहे.
सुनावणी दरम्यान उपविभागीय अधिकारी, उस्मानाबाद यांनी निरीक्षण केले असता सदर प्रकरणातील जमीन जुने सर्वे नं.३८, ३९ चा गट नं.९६ हि इनामी जमीन असल्याचे गाव नमुना नं.९ वरून दिसून आले. सदरील जमीन हि सेवा इनाम जमीन असल्याने त्यांचे हस्तांतरण बेकायदेशीर आहे. पीठासीन अधिकारी, वक्फ न्यायाधिकरण त्यांच्या suit no 40/2017 च्या दि.१५.०६.११ च्या आदेशात सदर जमीन हि जामा मस्जिद ढोकी यांची असून सदर जमीन हि महाराष्ट्र शासन राजपत्र दिनांक २७ मार्च १९८० अन्वये इनाम जमीन म्हणून नोंद असून हि वक्फ बोर्डाची मालमत्ता असल्याचे नमुद करण्यात आलेले आहे असे दिसून आले. सदर प्रकरणातील जमीन हि वक्फ प्रॉपर्टी असल्यामुळे सदर जमीन हि जामा मस्जिद ढोकी यांचे मालकीची असून सदर जमीन हि कोणालाही हस्तांतरित करता येत नाही. मूतवल्ली यांना सुद्धा सदर जमीन विकण्याचा किंवा हस्तांतरित करण्याचा कोणताही अधिकार नाही. असे असताना सुद्धा सदर जमिनीचा विक्री व्यवहार करण्यात आलेला आहे. प्रकरणात वक्फ ट्रिब्युनल बोर्ड औरंगाबाद यांनी सदर जमीन हि जामा मस्जिद ढोकी यांचे मालकीची असून वक्फ बोर्ड मालमत्ता असल्याचे आदेश वक्फ सूट नं. 40/2017 मध्ये दिलेले आहेत. व सदरचे आदेश हे मा.उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद यांनी दि. ११ नोव्हें २०११अन्वये कायम ठेवले असल्याचे निदर्शनास आले. तसेच महाराष्ट्र शासन परिपत्रक क्रमांक २०१५/प्र.क्र.१५१/ज.१ अ दि.०६ नोव्हें २०१८ अन्वये राज्यातील देवस्थानच्या जमिनीची तपासणी करून सदर जमिनी या बेकायदेशीर रित्या हस्तांतरित झाल्या असल्यास पूर्ववत देवस्थानच्या नावे करण्याबाबत आदेश देण्यात आलेले आहेत. या बाबींचे अवलोकन करून उपविभागीय अधिकारी श्री.चेतन गिरासे साहेब यांनी इनामी जमीन खरेदी विक्रीचा बेकायदेशीर फेर ७९५ हा रद्द करण्याचा आदेश पारित केला आहे.
प्रकरणाच्या निकालाची प्रत तहसीलदार उस्मानाबाद यांना देवून जामा मस्जिद ढोकी संदर्भात इनामी जमिनीचे बेकायदेशीर हस्तांतरण व्यवहार झालेले असतील तर त्याबाबत सखोल चौकशी करून अशी प्रकरणे महाराष्ट्र शासन परिपत्रक क्रमांक डिईव्ही- २०१५/प्र.क्र.१५१/ज-१ अ दि.०६ नोव्हें २०१८ अन्वये पुनरिक्षणार्थ दाखल करण्यात यावीत असे आदेशित केले आहे. ढोकी येथे जामा मस्जिदच्या मालकीची शेकडो एकर इनामी जमीन असून अनेक लोकांकडून बेकायदेशीर खरेदी विक्री व हस्तांतराचे अनेक प्रकार झालेले असून मा.उपविभागीय अधिकारी यांच्या या आदेशाने अशा लोकांचे धाबे दणाणले आहेत. असे अनेक प्रकरण समोर येण्याची शक्यता आहे. बेकायदेशीर खरेदी फेरफार क्र.७९५ रद्द झाल्याने व जमीन पूर्ववत देवस्थानच्या मालकीची झाल्याने जामा मस्जिद देवस्थानची देखभाल आणि सेवा होण्यास मदत होणार आहे. यासाठी गेल्या अनेक वर्षापासून लढा देत असलेले जमिनीचे वंशपरंपरागत इनामदार वाजीद खुददुस काझी यांच्या प्रयत्नास यश आले आहे. सदर प्रकरणात वादी कडून adv. फेरोज इसाक शेख यांनी युक्तिवाद मांडला. त्यांना Adv. एस. ए. भातलवंडे यांनी सहकार्य केले.