उस्मानाबाद/प्रतिनिधी-
मोटारसायकल व अॅटोरीक्षाचे लायसन्स काढून देण्यासाठी 4 हजार रुपयांची लाच घेणाऱ्या उस्मानाबाद उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील एका एजंटासह दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून गजाआड केले. ही कारवाई बुधवारी (दि.21) करण्यात आली.
तक्रारदार यास मोटारसायकल व अॅटोरीक्षाचे लायसन्स काढायचे होते. यावेळी आरटीओ कार्यालयात एजंट असलेल्या दिनेश दशरथ कोळी याने सहकारी संतोष मच्छिंद्र कांबळे (रा. येरमाळा) याच्यामार्फत या कामासाठी 4 हजार रुपयांची लाच मागितली. याप्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर बुधवारी आरटीओ कार्यालयाच्या परिसरात सापळा रचण्यात आला. यावेळी आरोपी दिनेश कोळी याने संतोष कांबळे याच्यामार्फत कार्यालयासमोरील हॉटेल तुळजाभवानी येथील कोळी याच्या कार्यालयात लाचेची रक्कम स्विकारताच दोघांना अटक केले.
तक्रार करण्याचे आवाहन
कोणताही शासकीय अधिकारी-कर्मचारी, शासनाचे मानधन,अनुदान घेणारा कर्मचारी अथवा खासगी व्यक्ती शासकीय कामासाठी लाचेची मागणी करत असेल तर तक्रर करण्याचे आवाहन उपाधीक्षक रवींद्र थोरात यांनी केले आहे. 
 
Top