
प्रतिनिधी / तुळजापूर-
कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवास आज दि. 22 सप्टेंबर रोजी सायंकाळी श्री तुळजाभवानी देवीच्या मंचकी निद्रेपासून प्रारंभ होणार आहे. त्यानंतर दि. 29 सप्टेंबर रोजी घटस्थापना होणार असून नवरात्रोत्सवातील धार्मिक विधी व इतर प्रथा परंपरांची माहिती जाहीर झाली आहे. महाराष्ट्रासह देशभरातील कोट्यवधी भाविकांचे आराध्य दैवत कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचा वर्षातील सर्वात मोठा उत्सव शारदीय नवरात्र महोत्सवास दि. 22 सप्टेंबर रोजी तुळजाभवानी मातेच्या मंचकी निद्रेपासून प्रारंभ होणार आहे. नवरात्र महोत्सवाची सांगता दि. 14 ऑक्टोबर,अश्विन पोर्णिमेला अन्नदान महाप्रसादाने होणार आहे. दरम्यान या वर्षीच्या नवरात्र महोत्सवावर दुष्काळ आणि महापूराचे सावट असणार आहे.
असे होणार विधी
रविवार, दि. 22 सप्टेंबर सायंकाळी तुळजाभवानी मातेची मंचकी निद्रा. रविवार, दि. 29 सप्टेंबर पहाटे तुळजाभवानी मातेची सिंहासनावर प्रतिष्ठापना, दुपारी 12 वाजता घटस्थापना, रात्री छबिना. सोमवारी, दि.30 सप्टेंबर, नित्योपचार पूजा, रात्री छबिना
मंगळवारी, दि. 01 ऑक्टोबर नित्योपचार पूजा, रात्री छबिना. दि. 2 ऑक्टोबर, ललित पंचमी, रथ अलंकार महापुजा, रात्री छबिना. गुरुवारी, दि. 3 ऑक्टोबर मुरली अलंकार महापुजा, रात्री छबिना.
शुक्रवारी, दि. 4 ऑक्टोबर रोजी शेषशाही अलंकार महापुजा, रात्री छबिना. शनिवारी, दि. 5 ऑक्टोबर भवानी तलवार अलंकार महापुजा, रात्री छबिना. रविवारी, दि. 6 ऑक्टोबर रोजी दुर्गाष्टमी, महिषासूर मर्दिनी अलंकार महापुजा, रात्री छबिना. सोमवारी, दि.7 ऑक्टोबर महानवमी, दुपारी 12 वाजता होमावर अजाबलीचा धार्मिक विधी, घटोत्थापन, रात्री नगरहून येणाऱ्या पलंग पालखीची मिरवणूक. मंगळवारी, दि. 8 ऑक्टोबर, विजया दशमी दसरा, उष:काली सीमोल्लंघन, मंचकी निद्रा. तर दि.13 ऑक्टोबरच्या पहाटे तुळजाभवानी मातेची सिंहासनावर प्रतिष्ठापना, रात्री सोलापूरच्या काठ्यासह छबिना, जोगवा. दि. 14 ऑक्टोबर नित्योपचार पुजा, अन्नदान महाप्रसाद, रात्री सोलापूर च्या काठ्यासह छबिना निघणार आहे.