उस्मानाबाद/प्रतिनिधी-
शेतक-यांची पिळवणूक थांबवा, तो सहन करतोय ; पण याद राखा, आमचे लोक बॅंकेत घुसल्यावर पळू नका, असा इशारा देत खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी राष्ट्रीयकृत बॅंकेच्या अधिका-यांना चांगलेच खडसावले. राष्ट्रीयीकृत बॅकांकउून आतापर्यंत केवळ ११ टक्के पीककर्ज वाटप झाल्याने कर्जासाठी बॅंकेत वारंवार चकरा मारणारे शेतकरी हताश झाले आहेत. त्यामुळे सोमवारी बॅंकेच्या अधिका-यांसोबत बैठक घऊन त्यांनी आढावा घेतला.
यावेळी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ, लिड बँकेचे व्यवस्थापक निलेश विजयकर, जिल्हा उपनिबंधक विश्वास देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती. सर्वप्रथम खासदार ओमराजे यांनी चालु खरीप हंगामात केवळ 11 टक्के पीककर्ज वाटप झाल्याबाबत बँक अधिका-यांना जाब विचारला. तुमच्याकडे शेतकरी कर्जासाठी चकरा मारत असताना, असंबंधीत कारणे सांगून त्यांना परत पाठवता, याची लाज नाही वाटत, असे सुनावले. जिल्ह्यातूनच ठेवी गोळा करता आणि येथीलच शेतक-यांना कर्जवाटपासाठी टाळाटाळ करता, हे चालणार नाही, असे बजावले. खासदारांनी सर्वप्रथम पीककर्जाशी निगडीत तक्रारी अर्ज घेऊन प्रत्येक शेतकरी व संबंधित बँकेच्या अधिका-यांना समोरासमोर बोलावून जाब विचारत त्यावर उपाय काढून पीककर्ज वाटप झालेच पाहिजे, असे स्पष्ट बजावले. त्यानंतर मुद्रालोन, विविध आर्थिक विकास महामंडळांकडील कर्ज या बाबतही विचारणा करून तरुणांना उद्योग व्यवसायासाठी आर्थिक मदत करण्याचे आदेश दिले. तसेच आलेल्या तक्रारींची तातडीने सोडवणूक करा, मी पुन्हा 15 दिवसांनी आढावा घेईन. तेव्हा माहिती सादर करा, चालढकल केल्याचे आढळल्यास परिणामांना सामोरे जाण्याची तयारी ठेवा, असे खडसावले. 
 
Top