उस्मानाबाद/प्रतिनिधी-
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय मेगाभरती झाली असेल तर सुशिक्षित बेरोजगार युवकांच्या मेगाभरतीकडेही आपण थोडसं लक्ष द्यावे एवढीच प्रामाणिक अपेक्षा आहे, कारण आपल्या पक्षात मेगाभरती होण्याअगोदर याच सुशिक्षीत बेरोजगार युवकांनी आपणांस प्रचंड महाजनादेश दिलेला आहे. म्हणुन लवकरच बेरोजगार युवकांच्या मेगाभरतीचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी उस्मानाबाद युथ फोरमचे संस्थापक अध्यक्ष अॅड. संजय भोरे यंानी केली आहे.
या संदर्भात काढलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्र सरकारने अर्थसंकल्पापूर्वी आर्थिक सर्वेक्षण सादर केले. त्यात राज्याच्या बेकारीची विदारक स्थिती मांडली आहे.  सेवायोजन कार्यालयात नोंदवलेल्या बेकारांच्या संख्येत 18 टक्के पदवीधर, 7 टक्के पदविकाधारक, 3 टक्के पदव्युत्तर पदवीधारक असे 28 टक्के सुशिक्षित बेकार आहेत. ही संख्या फक्त सेवायोजन कार्यालयात नोंदविलेली आकडेवारी आहे. तिथे न नोंदवलेली संख्या त्याच्या कितीतरी जास्त आहे. देशव्यापी एनएएएओ च्या 68 व्या फेरीत राज्यात ग्रामीण भागात बेकारीचा दर 2.2 आहे व शहरी बेकारीचा दर हा 3.4 दिलेला आहे व राज्याचा सरासरी बेकारीचा दर हा सरासरी 2.7 आहे. ही आकडेवारीबरोबर वास्तविकता दाखविणारी आहे. राज्यात इतकी बेकारी असताना मेगाभरतीच्या माध्यमातून रिक्त पदे तातडीने भरायला हवीत आणि त्याचवेळी निवृत्तीचे  वय 58 वर्षांवरच ठेवावे किंबहुना ते 55 वर्ष करावे.अशा प्रकारच्या मागणीचा उल्लेख त्यांनी केला आहे.

 
Top