उस्मानाबाद/प्रतिनिधी-
उस्मानाबाद शहराला जल शुध्दीकरण केंद्रातून पाणी पुरवठा करण्यात येत आहे. या केंद्रामध्ये मोठया प्रमाणात गाळ साचतो. पालिका कर्मचा-यांच्या माध्यमातून हा गाळा कढता येत नाही. त्यामुळे मंगळवारी जलशुध्दीकरण केंद्रातील गाळ काढण्यासाठी रोबोट चा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही सेवा स्वतंत्र एजन्सीमार्फत घेतली जाणार असल्याचेही यावेळी नगर परिषदेच्या आम सभेत ठरविण्यात आले.याच बैठकीत सांगली, कोल्हापूर, सातारा येथे पुरामुळे आडचणींत सापडलेल्या लोकांना आर्थिक मदद जाहीर करण्यात आली.तर नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर यांनी वर्षभराचे मानधन ३६ हजार रूपये व व्यक्तीगत पाच हजार रूपये असे ४१ हजार रूपए जाहीर केले.
नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली सभेला सुरूवात झाली असता सर्वप्रथम मागील सभेचे इतिवृत्त वाचण्यात आले. यानंतर विषय पत्रिकेवरील विषय चर्चेला घेतले. नागरिकांना शुध्द पाणीपुरवठा व्हावा, यासाठी फिल्टर उभे करण्यात आले आहेत. सदरील फिल्टरमध्ये नेहमीच मोठया प्रमाणात गाळ साचतो. हा गाळ व स्वच्छतेचे काम पालिका कर्मचा-यांकडून करता येत नाही. कर्मचा-यांनी गाळ काढला तरी तो पूर्णपणे निघत नाही, ही बाब विचारात घेता, गाळ काढण्यासाठी रोबोटचा वापर करण्याचा विषय सभागृहासमोर मांडण्यात आला. या विषयावर दोन्ही बाकांवरील सदस्यांनी आपली मते मांडल्यानंतर सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. यासाठी स्वतंत्र एजन्सी नेमण्यात येणार आहे. इच्छुकांकडून दर मागविण्याचा निर्णय ही यावेळी झाला. यानंतर राष्ट्रवादी कांग्रेसचे नगरसेवक अभय इंगळे यांनी धरासूर मर्दिनी कमान ते कचरा डेपोपर्यंतच्या रस्त्यावरील खड्डे मुरूम टाकून बुजवावेत, अशी मागणी केली. खराब रस्त्यामुळे विद्याथ्र्यांना ये-जा करता येत नसल्याची बाब त्यांनी निदर्शनास आणून दिली. प्रश्राचे गांभीर्य विचारात घेवून नगराध्यक्ष राजेनिंबाळकर यांनी मुरूम टाकण्याच्या कामाचे टेंडर काढून खड्डे बुजविण्यात येतील, अशी ग्वाही दिली.

 
Top