प्रतिनिधी /परंडा-अर्धा पावसाळा संपला तरी अद्याप जिल्ह्यातील सर्वात मोठे धरण सीना-कोळेगाव प्रकल्पात एक थेंबही पाणी साठा झाला नाही. परिसरात पाऊसच नसल्याने तीव्र दुष्काळामुळे पिण्याचे पाणी, जनावरांच्या चाऱ्याची स्थिती गंभीर बनली आहे. या पार्श्वभूमीवर सीना-कोळेगाव प्रकल्पात कुकडी प्रकल्पाचे पाणी सोडण्याची मागणी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी केली असून या अनुषंंगाने जलसंपदा मंत्र्यांनी अधीक्षक अभियंत्यांना याबाबत पाहणी करून माहिती सादर करण्याचे आदेश दिले आहे.
आमदार ठाकूर यांनी कुकडी प्रकल्पातील पाणी सिना कोळेगावमध्ये सोडण्याबाबत जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्याकडे मागणी केली आहे. याबाबत जलसंपदा विभागाचे पुणे येथील मुख्य अभियंता व उस्मानाबाद येथील अधीक्षक अभियंता यांना संपर्क करून प्रयत्न सुरू केले आहेत. जलसंपदा मंत्री महाजन यांनी तातडीने पाहणी करून कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. कुकडीचे पाणी सीना कोळेगाव प्रकल्पात आल्यानंतर सिंचन तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. |