उस्मानाबाद/प्रतिनिधी-
ग्रामीण अर्थव्यवस्थेचे बळकटीकरण करण्यासाठी शेतक-यांनी जोडधंदा करावा या उद्देशाने सहकारी संस्थांसाठी अटल अर्थसहाय्य ही योजना राबवण्यात येत आहे असे मत जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था विश्वास देशमुख यांनी व्यक्त केले. सहकार, पणन व वस्त्रोद्योग महाराष्ट्र शासन विभाग संचलित अटल महापणन विकास अभियान अंतर्गत जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, एकता खरेदी-विक्री सहकारी संस्था व एकता फाउंडेशन उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमानाने उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात आयोजित लोकसंवाद या कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी राज्यस्तरीय अटल अर्थसहाय्य समितीचे सदस्य रामदास कोळगे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व्यस्थापकीय संचालक प्रभाकर भुक्ता, एकता फाउंडेशनचे अध्यक्ष अमित कदम, महेश पवार, विशाल थोरात व जिल्हा पणन व्यवस्थापक सचिन कुंभार आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
सहकार क्षेत्रात विविध क्षेत्रातील व्यक्ती सोबतचा संवाद महत्त्वाचा असून सहकार मध्ये एकसंघ असणे खूप गरजेचे आहे. सहकारी संस्थेनी मान्यता झालेला प्रकल्पामध्ये गुणवत्ता, सातत्य व संस्थांचे रेकॉर्ड व्यवस्थित करणे हे खूप गरजेचे आहे असे मत यावेळी विश्वास देशमुख यांनी व्यक्त केले. सहकारी संस्थेने विविध कार्यकारी विकास सोसायटी यांच्यासोबत प्रकल्पाचे सांगड घालून संस्थानी  प्रकल्प उभा केल्यास सहकारी संस्थेचा फायदा होईल. अटल अर्थसाह्य योजनेमुळे सहकार क्षेञापासून दूर गेलेला शेतकरी वर्ग सहकार क्षेत्रात परत काम करत असून त्यामुळे ग्रामीण भागात विविध व्यवसाय उभे राहत आहेत असे यावेळी विश्वास देशमुख बोलताना म्हणाले.
उस्मानाबाद जिल्ह्यातील सहकारी संस्थानी महाराष्ट्रात आदर्श निर्माण होईल असे काम करावे असे आव्हान राज्यस्तरीय अटल अर्थसहाय्य समितीचे सदस्य रामदास कोळगे यांनी व्यक्त केले. एकता परिवाराने या कार्यक्रमाचे आयोजन करून सर्व सहकारी संस्थाना एकताच्या नावाप्रमाणेच एकत्र करुन जो संदेश दिला आहे तो अतिशय कौतुकास्पद असून एकता फाउंडेशने आपले कार्य असेच पुढे चालू ठेवावे असे ही मत यावेळी रामदास कोळगे यांनी व्यक्त केले. महाराष्ट्रात सहकारचे जाळे असून तोच वारसा आपणास अतिशय उत्तमपणे संस्था चालून पुढे घेऊन जाण्यासाठी अटल अर्थसाह्य योजना चालू केलेली असून संस्थेच्या उद्देशानुसार संस्थेने काम करुन अध्यक्ष व सचिवानी संस्थेचा पालक म्हणून काम केले तर संस्थेचे नाव महाराष्ट्रभर झाल्याशिवाय राहणार नाही असे यावेळी रामदास कोळगे बोलताना म्हणाले.
प्रस्तावीकपर भाषणात बोलताना आभिलाष लोमटे यांनी कार्यक्रम आयोजन करण्यामागची भुमिका स्पष्ट करत महाराष्ट्र शासनाने सहकारी संस्थेसाठी अंमलात आणलेली अटल अर्थसहाय्य योजनेबदल महाराष्ट्र शासनाचे आभार मानत सहकारी संस्थेनी आपल्या उद्देशाप्रमाणे काम करावे अशी ही अपेक्षा व्यक्त केली. यावेळी प्रभाकर मुळे व आविनाश खापे यांनी लाभार्थी मनोगत व्यक्त करत महाराष्ट्र शासनाचे आभार मानले.
 कार्यक्रमाची सुरुवात भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेचे पूजन करून व वृक्षाला पाणी घालून करण्यात आली. यावेळी जिल्हा उपनिबंधक विश्वास देशमुख व रामदास कोळगे यांचा एकता परिवाराच्यावतीने यथोचित सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिलाष लोमटे यांनी केले तर आभार प्रदर्शन जिल्हा व्यवस्थापक सचिन कुंभार यांनी केले. यावेळी उस्मानाबाद  जिल्ह्यातील सहकारी संस्थेचे अध्यक्ष, सचिव,  सदस्य व गटसचिव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top