उस्मानाबाद/प्रतिनिधी -
स्पर्धेच्या युगात यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी व्यक्तीमत्त्व विकासावर भर देणे गरजेचे आहे. त्याचबरोबर सर्वांगीण विकास साधण्यासाठी स्पर्धा परीक्षांना सामोरे गेले पाहिजे. एकदा अपयश आले म्हणून खचून न जाता नव्या जोमाने तयारी करावी, सातत्यपूर्ण प्रयत्न हीच यशाची गुरुकिल्ली आहे, असे प्रतिपादन उपविभागीय पोलीस अधिकारी मोतीचंद राठोड यांनी केले.
तालुक्यातील अंबेजवळगे येथील स्वामी विवेकानंद सार्वजनिक वाचनालय व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या वतीने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय वक्तृत्त्व आणि निबंध स्पर्धेतील विजेत्यांना रविवारी (दि.25) पारितोषिक वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. व्यासपीठावर सरपंच आनंद कुलकर्णी, पोलीस पाटील मोहन गुरव, शिक्षक भारत साबळे, श्री. सातपुते यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना मोतीचंद राठोड यांनी आपल्या जीवनात उपविभागीय पोलीस अधिकारी पदापर्यंतचा प्रवास कथन करून विद्यार्थ्यांनी जिद्द व चिकाटी अंगी बाळगून यश संपादन करावे, असे आवाहन केले.  तसेच अंबेजवळगेसारख्या ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनासाठी केंद्र उपलब्ध करून दिल्याबद्दल संयोजकांचे आभार व्यक्त केले. विद्यार्थी घडविण्यासाठी सुरू असलेल्या स्वामी विवेकानंद वाचनालय व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या या कार्यात आपणही सक्रिय योगदान देऊ अशी ग्वाही त्यांनी दिली. उपस्थित मान्यवरांनीही यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमात निबंध व वक्तृत्त्व स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह व गुलाबपुष्प देऊन गौरविण्यात आले. 
कार्यक्रमासाठी स्वामी विवेकानंद वाचनालय व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे पदाधिकारी अमोल सारडे, सचिन चांदणे, बालाजी जाधव, संजय कुलकर्णी, गणेश मोरे, विकास चांदणे, मेजर विष्णू चांदणे आदींनी परिश्रम घेतले.
वक्तृत्त्व स्पर्धेतील विजेते 
पहिली ते सातवी - प्रीती विजय भोसले (प्रथम), श्री नागनाथ टाकणखार (द्वितीय), श्रद्धा नागनाथ टाकणखार (तृतीय), मेघा पंढरी पांढरे, स्वरांजली  कृष्णा येडाळे (उत्तेजनार्थ). आठवी ते बारावी - सानिका मुकुंद करपे (प्रथम), साक्षी बालाजी कोळेकर (द्वितीय), अश्विनी अशोक कांबळे (तृतीय). 
निबंध स्पर्धेतील विजेते 
पहिली ते सातवी गट - श्रद्धा नागनाथ टाकणखार (प्रथम), प्रीती विजय भोसले (द्वितीय), स्वानंदी रमेश होळे (तृतीय) प्रियदर्शनी मोहन गुरव, ऋतुजा नेताजी बिरंजे (उत्तेजनार्थ), आठवी ते बारावी - रेणुका दीपक वाघमारे (प्रथम), सानिका मुकुंद करपे (द्वितीय), सुजाता सुशेन चांदणे (तृतीय), सुयोग अरूण कांबळे, निकिता सुनील चांदणे (उत्तेजनार्थ), महाविद्यालयीन गट - शैलेंद्र विश्वासराव पाटील (प्रथम), स्नेहल अरूण कांबळे (द्वितीय), ज्ञानेश्वरी यशवंत पाटील (तृतीय).
 
Top