 प्रतिनिधी/उस्मानाबाद- राष्ट्रीय बालहक्क आयोगाच्या वतीने नीती आयोगाच्या यादीतील आकांक्षित जिल्ह्यांमध्ये बालकांच्या हक्क व संरक्षणासंदर्भात तक्रारी, अडचणींच्या सोडवणुकीसाठी जनसुनावणीचे आयोजन उस्मानाबादेत शुक्रवारी (दि. ९) करण्यात आले होते. यावेळी उस्मानाबाद येथील बालकल्याण समिती व बालकल्याण विभागामध्ये समन्वय नसल्याचे समोर आल्यावर आयोगाचे अध्यक्ष प्रियांक कनुंगो यांनी येथील अशासकीय सदस्यांना "सुनावत पोलिस, बालकल्याण विभागाच्या समन्वयातून कामकाज करण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी व्यासपीठावर बालहक्क आयोगाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रवीण घुगे, सदस्या शालीन कराड, जिल्हाधिकारी दीपा मुधोळ,पोलिस अधीक्षक आर. राजा, जिल्हा परिषदेचे सीइओ संजय कोलते आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती. यावेळी प्रियांक कनुंगो यांनी सर्वप्रथम या आयोगाच्या कामकाजासह उस्मानाबादेत आयोजित करण्यात आलेल्या जनसुनावनी कार्यक्रमाबाबत माहिती दिली. यामध्ये तक्रार दाखल झाल्यानंतर ती कोणत्या विभागाची याची पडताळणी करून त्यांच्याकडे ती तत्काळ सोपवली जात होती. त्यांच्याकडून याबाबत जागेवरच खुलासा घेऊन पुढील कीती दिवसात या तक्रारीचा निपटारा होणार याची लेखी विचारणा होत होती. त्यानंतर पिठासनसमोर ही माहिती सादर होऊन याबाबत निर्देश देण्यात येत होते. तसेच दिलेल्या निर्देशाची दखल न घेतल्यास आयोगाकडून होणाऱ्या कारवाईस सामोरे जावे लागेल असा इशाराही यावेळी प्रियांक कनुंगो यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या. ही सुनावनी उस्मानाबाद, लातुर, बीड या तीन जिल्ह्यातील बालहक्क व संरक्षणाशी निगडीत प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी या जनसुनावनीचे खुद्द राष्ट्रीय अध्यक्षांच्या उपस्थितीत आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्वप्रथम तक्रारदाराचा अर्ज घेऊन याप्रकरणी तत्काळ संबधित विभागाच्या अधिकाऱ्याकडून लेखी स्वरूपात कार्यवाहीची माहिती नोंदीला घेतली जात होती. त्यानंतर अायोगासमोर अर्जदार व संबधित विभागाचे अधिकारी बोलावून सदरील तक्रारीचे निराकरण करण्यात येत होते. जनसुनावणीसाठी राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाचे सुंदीप राठी, अभिकर्ष त्यागी, पूजा जैस्वाल, शेफाली अवस्थी यांनी मार्गदर्शन केले |