उस्मानाबाद/प्रतिनिधी-
मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या महाराष्ट्रव्यापी महाजनादेश यात्रेचा नंदुरबार ते सोलापूर हा दुसरा टप्पा 21 ऑगस्ट पासून नंदुरबार येथून प्रारंभ होणार असून 11 दिवसांच्या दुस-या टप्प्यातील महाजनादेश यात्रेचा 14 जिल्ह्यातून 55 विधानसभा आणि 1839 कि. मी. अंतराचा प्रवास असेल, अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस व यात्रा प्रमुख आमदार सुजितसिंह ठाकूर दिली.
यात्रा प्रमुख आ. सुजितसिंह ठाकूर म्हणाले की, मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा पहिला टप्पा 1 ऑगस्ट रोजी अमरावती जिल्ह्यातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची कर्मभूमी गुरुकुंज मोझरी येथून भाजपाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष व संरक्षण मंत्री मा. राजनाथसिंगजी, प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री मा. चंद्रकांतदादा पाटील आदी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला. हा टप्पा 9 ऑगस्ट रोजी नंदुरबार येथे संपणार होता. मात्र राज्यातील सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील पूर परिस्थितीमुळे तीन दिवस आधीच महाजनादेश यात्रा स्थगित करण्यात आली. महाजनादेश यात्रेच्या पहिल्या टप्प्यात 10 जिल्हे, 51 विधानसभा आणि 1369 कि. मी. अंतराचा प्रवास झाला. पहिल्या टप्प्यात महाजनादेश यात्रेला उस्फूर्त व अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. मा. देवेंद्रजी फडणवीस हे आपल्या सरकारच्या पाच वर्षाच्या कामांचा राज्याच्या जनतेसमोर जाऊन लेखाजोखा मांडणारे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री असून अनेक ठिकाणी यात्रेच्या नियोजनात जिथे केवळ स्वागत होते तिथे स्वागत सभा कराव्या लागल्या. जिथे स्वागत सभांचे नियोजन होते तिथे सभा आणि सभेच्या ठिकाणी मोठ्या संख्येच्या सभा झाल्या.
सर्व ठिकाणी महिला व युवकांची सहभागी संख्या लक्षणीय असल्याचे सांगून आ. ठाकूर म्हणाले, विशेष म्हणजे गडचिरोली येथे रात्री मोठी सभा झाली आणि देवेंद्रजी फडणवीस हे गडचिरोलीत रात्रीचा मुक्काम करणारे पहिले मुख्यमंत्री ठरले.
आधीच्या नियोजनानुसार महाजनादेश यात्रेचा दुसरा टप्पा 17 ऑगस्ट रोजी सुरू होणार होता. मात्र आता यात्रेच्या वेळापत्रकात बदल करून 21 ते 31 ऑगस्ट, नंदुरबार ते सोलापूर या दुस-या टप्प्यात उत्तर महाराष्ट्रील नंदुरबार, धुळे, जळगाव व अहमदनगर, विदर्भातील बुलढाणा, मराठवाड्यातील बीड, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर व उस्मानाबाद आणि पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर या 14 जिल्ह्यातील 55 विधानसभा मतदारसंघातून 1839 कि. मी. अंतराचा प्रवास होणार असल्याचे यात्रा प्रमुख आ. सुजितसिंह ठाकूर यांनी सांगितले. 
 
Top