उस्मानाबाद/प्रतिनिधी:-मा.भारत निवडणूक आयोगाच्या  आदेशानुसार  तामीळनाडू राज्यातील तिरूचिरापल्ली येथून आगामी विधानसभा सार्वत्रि‍‍क निवडणूक – २०१९ च्या अनुषंगाने BU-९२०, CU-1680 व VVPAT-1780 प्राप्त करुन घेण्याबाबत सूचना प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार उस्मानाबाद जिल्‍हयातील  निवडणूक विभागातील अधिकाऱ्यांनी तिरूचिरापल्ली येथून ताब्यात घेवून  दि.१२ ऑगस्ट रोजी येथील मौजे. पिंपरी ता.उस्मानाबाद येथील शासकीय ईव्हीमएम  गोदामामध्ये पोलीस बंदोबस्तात ठेवण्यात आल्या आहेत.
            विधानसभा सार्वत्रिक निवडणूक, २०१९ च्या अनुषंगाने  या मशीन्सची प्रथमस्तरीय (FLC) तपासणीकरिता भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनी लि. बेंगलोर यांचे ५ अभियंते मशीन तपासणी करीता जिल्हयात आले आहेत. आज दि. १६ ऑगस्ट रोजी EVM/VVPAT मशीनच्या प्रथमस्तरीय तपासणीस(FLC)  मौजे. पिंपरी ता.उस्मानाबाद येथील शासकीय ईव्हीएम गोदामामध्ये पोलीस बंदोबस्तात  सुरूवात झालेली आहे.
    जिल्हाधिकारी कार्यालयाकडून या प्रथमस्‍तरीय तपासणी (FLC) करीता  राजकीय पक्षांच्‍या प्रतिनिधींना उपस्थित राहणेबाबत विनंती पत्रे देण्‍यात आली होती. त्यानुषंगाने आज प्रथम दिवशी  मौजे. पिंपरी ता.उस्‍मानाबाद  येथे EVM/VVPAT मशीनची प्रथमस्‍तरीय तपासणीच्‍या (FLC)  वेळी भारतीय जनता पार्टी ,  शिवसेना, राष्‍ट्रवादी, वंचित बहुजन आघाडी या प्रमुख पक्षांच्या प्रतिनिधींनी EVM मशीनवर मतदान करुन मतदानयंत्राची पडताळणी भारत इलेक्‍ट्रॉनिक्‍स कंपनी लि., बेंगलोर यांच्या अभियंत्यांसमक्ष करुन  घेतली. 
        भारत इलेक्‍ट्रॉनिक्‍स कंपनी लि.बेंगलोर या कंपनीच्‍या अभियंत्यांच्या निर्देशानुसार EVM/VVPAT मशीनच्या प्रथमस्‍तरीय तपासणीच्‍या (FLC)  वेळी तांत्रिक दोष आढळून आलेल्या मशीन्स  फॉल्टी म्हणून रद्द करुन बाजूला ठेवण्यात आल्या आहेत. 
          प्रथमस्‍तरीय तपासणी (FLC) साठी मा.भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे काटेकोर पालन करण्यात येत आहे,असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, दीपा मुधोळ- मुंडे यांनी कळविले आहे.
 
Top