प्रतिनिधी / उस्मानाबाद- जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी तसेच कौटुंबिक स्वास्थ्य टिकवण्यासाठी प्रत्येक माता व बालकांचे आरोग्य सुधारणे ही काळाची गरज बनली आहे, असे मत जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी येथे व्यक्त केले. 
उस्मानाबादेत गालिबनगर येथील अलमा सिद्धीकी अहमद उर्दू शाळा व मदरशामध्ये नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने जननी शिशु सुरक्षा आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याचा शुभारंभ जिल्हाधिकारी मुंडे यांच्या हस्ते झाला. यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते, आरोग्य उपसंचालक डॉ. एकनाथ माले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हनुमंत वडगावे, जिल्हा रुग्णालयातील बाह्य संपर्क विभागाचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. धनंजय पाटील, पत्रकार मोतीचंद बेदमुथा, मुफ्ती रहमतुल्ला खान, मीर हजरत अली, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शेवाळे आदी उपस्थित होते. 
जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे म्हणाल्या की, उस्मानाबाद जिल्हा हा नीती आयोगात साक्षांकित आहे. त्यामध्ये ग्रामीण व शहरी भागातील गरोदर माता व बालकांच्या आरोग्याच्या निर्देशांकाला विशेष महत्त्व आहे. ग्रामीण भागात आशा, आरोग्य सेविकांमार्फत सेवा अधिक गुणवत्तापूर्ण देऊन प्रत्येक गरोदर माता व बालकांना आरोग्यसेवेच्या प्रवाहात आणावे, अशीही सूचना त्यांनी यावेळी केली. त्यासोबतच शहरी भागातही जननी शिशु सुरक्षा शिबिरे आयोजित करण्यात यावेत, या शिबिरांच्या माध्यमातून आरोग्य व्यवस्था सुदृढ करावी, असेही त्या म्हणाल्या. कार्यक्रमासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. पाटील, ऐ. यु. लाकाळ, दिलीप जाधव विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चेतन दुबे यांनी केले. 

 
Top