उस्मानाबाद/प्रतिनिधी-
इतर पक्षात पिढया ना पिढया सतरंज्या उचलण्यांत जातात. परंतू शिवसेना एकमेव असा पक्ष आहे की, जिथे जात पात पाहिली जात नाही, संबंधित व्यक्तीचे कर्तृत्व पाहिले जाते. पक्षाने आजपर्यंत ज्या जबाबदा-या माझ्यावर सोपविल्या त्या मी यशस्वीपणे पार पाडल्या. त्यामुळेच माझ्या कर्तृत्वावर मी मंत्री झालो, असे प्रतिपादन जलसंधारणमंत्री ना.तानाजी सावंत यांनी केले. यावेळी त्यांनी न.प.शाळेच्या विद्याथ्र्यांसाठी पाच बसेस देण्याची घोषणा केली.
नगर परिषदेच्या वतीने ना.तानाजी सावंत व खासदार ओमराजे निंबाळकर यांचा नागरी सत्कार शनिवार दि.२० जुलै रोजी दुपारी करण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर, उपगनराध्यक्ष सुरज साळुंखे, सहसंर्पकप्रमुख अनिल खोचरे, युवा संपर्क प्रमुख नितीन लांडगे, जि.प.सदस्य दत्ता सालुंखे यांची उपस्थिती होती. ना.तानाजी सावंत यांनी आपल्या कर्तृत्वाची झलक सांगताना एका महिन्यात मी ५२५ बंधा-यांना मंजुरी दिली आहे. जलसंधारण मधील जे पारंपारिक धोरण आहे. ते बदलून नव्याने धोरण ठरविले आहे. माझ्या कामाची पध्दत थोडे बोला, सबुरी ने चला अशा पध्दतीची असून हा वडीलकीचा सल्ला आहे, असे सांगितले. विरोधकांनी चुका केल्यामुळेच आपल्याला संधी मिळाली. त्यामुळे आमदार, खासदारांनी विकासाचे व्हिजन समोर ठेवून काम करावे, उस्मानाबाद शहर व जिल्हयाचा आजपर्यंत विकास का झाला नाही, हा डाग पसून काढण्यासाठी आपल्याला मिळालेल्या संधीचे सोने करून प्रामाणिकपणे कार्य करावे, असे सांगितले. यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी ना.तानाजी सावंत यांच्या कर्तृत्वाचे कौतुक करून ना.सावंत व मी अंत्यत वाईट वेळ अनुभवली आहे. निवडणुकी मध्ये कांग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात घटस्फोटानंतर ज्या प्रमाणे नवरा-बायकोत प्रेम उफळून येते त्या प्रमाणे वागले. परंतू लोंकांना आमच्यासारख्या लोक प्रतिनिधींची गरज असल्यामुळे लोंकांनी आम्हाला निवडून दिले.  ४० वर्षांत जे झाले नाही, आम्ही करून दाखवू.  २१ टीएमसी पाण्यासाठी, सोलापूर-तुळजापूर रेल्वे मार्गासाठी संसदेत आवाज उठविला आहे, असे सांगून खासदार राजेनिंबाळकर यांनी जिल्हयात शेतक-यांच्या आत्महत्या का वाढल्या, याचे मुळ काय आहे ? हे पाहूनच २१ टीएमसी पाणी आणण्याचा अथक प्रयत्न मी व ना.तानाजी सावंत करीत आहोत, असे सांगितले.
यावेळी,नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर यांनी पंतप्रधान व रमाई आवास योजने मधील घरकुलांचे प्रमाणपत्र पाहुण्याच्या हस्ते वाटप केले व आडीच वर्षांतील २५ कोटींच्या विकास कामाविषयी माहिती दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार शिवसेना गटनेते सोमनाथ गुरव यांनी मानले.यावेळी  नगरसेवक सिध्देश्वर कोळी, राजाभाऊ पवार, सिध्दार्थ बनसोडे, राणा बनसोडे, अक्षय ढोबळे, पप्पु मुंढे, तुषार निंबाळकर, नितीन शेरखाने, प्रविण कोकाटे व शिवसेना कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

 
Top