भूम (प्रतिनिधी)-  भूम तालुक्यातील माणकेश्वर येथील प्रसिद्ध सटवाई मंदिरात देवीच्या मुखवट्यावर लावण्यात आलेला शेंदूर काढण्याच्या प्रक्रियेला अखेर प्रशासनाने सुरुवात केली आहे. या संपूर्ण कामासाठी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मंगळवारी (दि.28) सकाळपासून ही प्रक्रिया अधिकृतरित्या सुरू करण्यात आली.  

गेल्या अनेक वर्षांपासून मंदिरातील देवीच्या मुखवट्याची मूळ रचना बदलल्याची भावना भाविकांमध्ये होती. मुखवट्यावर सतत लावल्या जाणाऱ्या शेंदुरामुळे मूर्तीचे मूळ स्वरूप झाकले गेले असल्याची चर्चा होती. त्यामुळे मूर्तीला मूळ स्वरूपात आणण्यासाठी शेंदूर काढण्यात यावा, अशी मागणी भाविकातून सातत्याने होत होती. या मागणीसाठी समाजसेवक हभप गणेश अंधारे महाराज यांनी उपोषण केले होते. यामुळे हा विषय अधिक चर्चेत आला. या पार्श्वभूमीवर गुरुवारी (दि.16) पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंदिराला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली होती. यावेळी मूर्तीची तपासणी करण्यास मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष व पुजारी यांनी विरोध दर्शविला होता. मात्र पुरातत्त्वज्ञ सागर मुंडे यांनी शास्त्रीय पद्धतीने, रासायनिक प्रक्रियेद्वारे शेंदूर काढणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले होते. छत्रपती संभाजीनगर येथील पुरातत्व विभागाच्या सहाय्यक संचालक जया वाहने तसेच राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत काळजीपूर्वक आणि शास्त्रीय पद्धतीने शेंदूर काढण्याचे काम सुरू आहे. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी साधारण तीन दिवसांचा कालावधी लागणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. दरम्यानच्या काळात काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल चोरमले, परंडा येथील पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण शिरसाट यांच्यासह मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. माणकेश्वर येथील पुरातन मंदिरातील मूर्तीवरील शेंदूर काढण्याचे काम सकाळी दहाच्या आसपास चालू होऊन दुपारी चार पर्यंत चालले.


 
Top