उस्मानाबाद/प्रतिनिधी- विश्वाची निर्मिती कशी झाली? याची उत्सुकता प्रत्येकालाच असते. शालेय जीवनात ग्रह, तारे, धुमकेतू, सुर्यमालेतील सर्व ग्रहांचे अंतरंग, ग्रहणाची कारणे, अशा विविध बाबींचे ज्ञान आत्मसात झाल्यास भविष्यातील अनेक अंधश्रध्दा आपोआप गळून पडतात. त्यासाठी महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या उस्मानाबाद शाखेने शाळांच्या भेटीसाठी फिरते थ्रीडी नभांगण उपलब्ध करून दिले होते. आकाशगंगेतील घडामोडींची अत्यंत मनोरंजक आणि चिकित्सक माहिती सहा हजार विद्यार्थ्यांनी मागील पंधरवाड्यात अनुभवली आहे. 
महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या उस्मानाबाद जिल्हा शाखेने विद्यार्थ्यांमध्ये खगोलशास्त्रीय माहितीची जिज्ञासा वाढावी, त्यातून विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण व्हावी, याकरिता फिरते नभांगण हा उपक्रम राबविला. याला शहर व परिसरातील शाळांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यामुळे विद्यार्थ्यांना तार्‍यांच्या जगात भटकंती करण्याची अनुभूती मिळाली. महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीने पूर्ण खगोलशास्त्रीय माहिती, ग्रह, तारे, आकाशगंगा आदी माहितीचे व्यवस्थीत संकलन करून एका आकर्षक रंगात फिरती व्हॅन तयार केली आहे. संपूर्ण थ्रीडी अशी डिजिटल स्वरूपाची ही व्हॅन विद्यार्थ्यांच्या भेटीसाठी शाळेत जाते. त्याद्वारे विद्यार्थ्यांना खगोलशास्त्राची माहिती देण्यात येते. बारा बाय वीस फूट आकाराच्या एका फुगवलेल्या डोममध्ये विश्वाची निर्मिती कशी झाली? याबद्दलची पूर्ण माहिती सादर केली जाते. 
तार्‍यांचा जन्म, धुमकेतू, न्येबुला, सूर्याचे व सूर्यमालेतील सर्व ग्रहांचे एकमेकांशी असलेले परस्पर संबंध, पृथ्वीवरील आपले अस्तित्व, ग्रहगोलांची आपल्यापासून असलेली प्रचंड अंतरे, सर्वसामान्य लोकांच्या मनात ग्रह, राशी, नक्षत्र या विषयांची असलेली अकारण भीती, नक्षत्रांच्या निर्मितीमागील रंजक गोष्टी, तार्‍यांवरून दिशांचे आकलन, अशी सर्व माहिती अत्यंत मनोरंजकपणे मुलांना या उपक्रमाच्या माध्यमातून दाखविण्यात आली.
केवळ मोठमोठ्या शहरात उपलब्ध असलेले असे डिजिटल नभांगण थेट ग्रामीण भागातील शाळांमध्ये माहितीचा खजिना घेऊन जात असल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांच्या मनातील वैज्ञानिक दृष्टिकोन विकासात भर पडत आहे. त्याचबरोबर या फिरते नभांगण कार्यक्रमानंतर चमत्कारामागील विज्ञान हा संवादाचा मनोरंजक कार्यक्रम भास्कर सदाकळे अत्यंत रंजक पध्दतीने विद्यार्थ्यांसमोर सादर करतात. त्यामुळे ग्रहगोलांच्या दुनियेत रमलेला विद्यार्थी आपसुक वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार करायला सुरूवात करतो. 
उस्मानाबादमधील छत्रपती शिवाजी हायस्कूल, भोसले हायस्कूल, नगरपालिकेच्या सर्व शाळा, जिल्हा परिषद कन्या प्रशाला, पोतदार इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल, जिल्हा परिषद हायस्कूल, जयहिंद विद्यालय कसबे तडवळे, तुळजाभवानी इंग्लिश स्कूल, एकलव्य आश्रमशाळा यमगरवाडी, आपलं घर नळदुर्ग, धरित्री विद्यालय, नूतन हायस्कूल, भाई उध्दवराव पाटील प्रशाला आदी शाळांमधील सहा हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी या फिरत्या नभांगणाची अनुभूती घेतली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अंनिसचे ज्येष्ठ कार्यकर्ते चंद्रकांत उळेकर यांनी विशेष परिश्रम घेतले. 
 
Top