प्रतिनिधी / उस्मानाबाद-
अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण करून मातंग समाजाला लोकसंख्येनुसार आरक्षण द्या, मातंग समाजावरील होणारे अन्याय रोखण्यासाठी कायद्यामध्ये मातंग समाजासाठी स्पेशन अॅक्टची तरतूद करावी, यासह अन्य मागण्यांसाठी लहुजी शक्ती सेनेच्या वतीने मंगळवारी (दि.30) जिल्हाधिकारी कार्यालयावर मातंग समाज एल्गार महामोर्चा काढून निवेदन देण्यात आले. लहुजी शक्ती सेनेच्या वतीने काढलेल्या मातंग समाज एल्गार महामोर्चाची सुरूवात सकाळी 11 वाजेच्या सुमारास शहरातील आण्णाभाऊ साठे चौकातून करण्यात आली होती. हा मोर्चा देशपांडे, ताजमहल टॉकी, छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यामध्ये मोठ्या संख्येने समाजबांधव सहभागी झाले होते. निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मातंग समाजाला लोकसंख्येनुसार आरक्षण द्यावे, समाजावरील अन्याय रोखण्यासाठी स्पेशल अॅक्टची तरतूद करावी, क्रांतिवीर लहुजी साळवे मातंग समाज अभ्यास
आयोगाच्या शिफारशी त्वरीत लागू कराव्यात, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत होणारा कर्जपुरवठा लवकरात लवकर सुरू करावा. साठे जयंतीदिनी शासकीय सुट्टी जाहीर करावी, मराठी साहित्यातील अमुल्य योगदानाबद्दल विश्वविख्यात साहित्यिक, साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांचा 1 ऑगट हा जन्मदिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा करा, मातंग आरक्षण हुतात्मा संजय ताकतोडे यांच्या परिवारातील एकास शासकीय नोकरीत सामावून घ्या, बोरगांव (तु. ता. तुळजापूर) येथील सुरेश देडे व त्यांच्या भावांचे घर पाडल्याने त्यांचे शासकीय पुर्नवसन करावे, बोरगांव येथील आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी, पीडित सुरेश देडे हे अपंग असल्याने त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीस नोकरीस घेऊन सर्व अन्यायग्रस्त मातंग कुटुंबाचे पुर्नवसन करून प्रत्येकी दहा लाख रुपये मदत जाहीर करावी, उस्मानाबाद शहरात लोकशाहिर आण्णाभाऊ साठे यांचा पुर्णाकृती पुतळा नियोजीत ठिकाणी उभारण्यात यावा, क्रांतीपिता लहुजी साळवे चौकात सुशोभीकरण करावे, सांगली जिल्ह्यातील परतापूर येथील जाधव कुटुंबियांना पोलिसांनी केलेल्या लाठी हल्ल्याची सीआयडी चौकशी करावी, यासह अन्य मागण्यांचे निवेदन देण्यात आले. वरील सर्व मागण्यांसाठी लहुजी शक्ती सेनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर मातंग समाज एल्गार महामोर्चा काढला होता. निवेदनावर जिल्हाध्यक्ष शिवाजी गायकवाड, बालाजी गायकवाड, सारिका कांबळे, महेश सोनपारखे, रोहित खलसे, संतोष मोरे, संभाजी कांबळे, लक्ष्मण क्षीरसागर, तानाजी कांबळे, सुभाष गव्हाळे, बाळासाहेब कांबळे, बाळासाहेब देडे, दिलीप गायकवाड, मुकेश देडे, पांडुरंग कदम, किसन देडे, दीपक रोडगे, गणेश शिंदे आदींच्या स्वाक्षरी होत्या. 

 
Top