उस्मानाबाद/प्रतिनिधी12 जून हा जागतिक बालकामगार विरोधी दिन असून बालकामगार ही एक अनिष्ट प्रथा आहे. याकरिता दुकाने, आस्थापना, हॉटेल, इतर व्यापारी संस्था व विविध उद्योगातील मालकांनी त्यांच्याकडे  बालकामगार ठेवू नयेत, असे सरकारी कामगार अधिकारी यांनी कळविले आहे.
बालकामगार प्रथा आजही सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक समस्यांशी निगडित असून 12 जून या जागतिक बालकामगार विरोधी दिनानिमित्त या अनिष्ट प्रथेविरुद्ध व्यापक प्रमाणात जनजागरण होणे आवश्यक आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या बालकामगार (प्रतिबंध व नियंत्रण) अधिनियम 1986 नुसार 14 वर्षाखालील मुलांना धोकादायक उद्योगांमध्ये जसे की, हॉटेल, रोडवरील धाबे, भोजनालय, बार आणि परमिट रूम, गॅरेज, मटन शॉप,  खडी केंद्र, सर्व प्रकारचे कारखाने, सॉ-मिल, सर्व शासकीय, खाजगी इमारत व बांधकाम उद्योग, घरकाम, प्रिंटिंग प्रेस, ऑटोमोबाईल्स, फॅब्रिकेशन वर्कशॉप, तेल गाळणे व शुद्धीकरण, कागद निर्मिती, खाणीमधून दगड काढणे इत्यादी ठिकाणी कामावर ठेवणे,हा गंभीर गुन्हा आहे. या नियमाचे उल्लंघन केल्यास दहा ते वीस हजार रुपये दंड व तीन महिने ते एक वर्ष कारावासाची शिक्षा असून कामावर बालकामगार आढळल्यास प्रत्येक कामगारामागे रुपये वीस हजार नुकसान भरपाई वसूल करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत.
          तरी विविध उद्योगातील दुकानदारांनी, व्यापाऱ्यांनी बालकामगारांना कामावर ठेवू नये अन्यथा आपल्याविरुद्ध बालकामगार कायद्यांतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी, असे सरकारी कामगार अधिकारी यांनी कळविले आहे.
 
Top