प्रतिनिधी /उस्मानाबाद-
आयुष्यमान भारत आरोग्यवर्धिनी कार्यक्रमांतर्गत ग्रामीण भागात आरोग्य उपकेंद्रामध्ये समुदाय अधिकारी (वैद्यकीय अधिकारी) यांच्या नेमणुकीमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सेवा देण्यास बळ मिळत असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील यांनी केले.
उस्मानाबाद येथे आरोग्यवर्धिनी कार्यक्रमांतर्गत समुदाय अधिकारी जिल्हास्तरीय कार्यशाळेचे बुधवारी (दि.१२)जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील बोलत होत्या. यावेळी कार्यशाळेस जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच. व्ही. वडगांवे, जिल्हा क्षयरोग नियंत्रण अधिकारी डॉ. होळे, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सय्यद, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अन्सारी, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. पांचाळ, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. गरड, तसेच तालुका आरोग्य अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना उपाध्यक्षा पाटील म्हणाल्या की, ग्रामीण भागात उपकेंद्र स्तरावर समुदाय अधिकारी यांची नेमणूक करण्यात आलेली असून यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना याची मोठ्या प्रमाणात सेवा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील आरोग्यास बळकटी मिळणार आहे. तसेच या कार्यक्रमांतर्गत बी. पी., शुगर, हायपरटेंशन इत्यादी आजाराची तपासणी करण्यात येणार असून योगा, प्राणायम याबाबत समुपदेशन करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील गरोदर महिलांची विशेष काळजी घ्यावी व त्यांना चांगल्या प्रकारची आरोग्यसेवा पुरवावी अशीही सुचना पाटील यांनी संबंधीत अधिकारी व कर्मचाऱ्यांना यावेळी केली. या कार्यशाळेला समुदाय अधिकारी, जिल्हा स्तरीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
विशेष पाठपुरावा : समुदाय अधिकाऱ्यांमार्फत ग्रामीण अारोग्य सेवा सुधारण्यासाठी प्रयत्न करण्यात आला. यासाठी जिप उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील यांनी शासनाकडे विशेष पाठपुरावा केला.
जिल्हास्तरीय समुदाय अधिकारी कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला
 
Top