प्रतिनिधी /उस्मानाबाद-
|
| उस्मानाबाद शहरातील एका प्रसिध्द मेडिकलमध्ये विक्रीस बंदी असलेले गर्भनिरोधक औषधी आढळून आले. सोमवारी (दि.३) अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या तपासात ही बाब आढळून आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, असे असले तरी प्रशासनाने याबाबत अधिकृत दुजोरा दिला नव्हता. मंगळवारी (दि.४) रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान, या प्रकारावरून शहरात गर्भनिरोधक औषधी विक्रीचा गोरख धंदा सुरू असल्याचे दिसून येत आहे. शासनाने गर्भनिरोधक औषधी विक्रीस बंदी घातली आहे. मात्र, शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील एका मेडिकलमध्ये गर्भनिरोधक गोळ्या मिळत असल्याची माहिती मिळाली होती. त्याप्रमाणे सोमवारी (दि.३) अन्न व औषध प्रशासनाच्या कर्मचारी, अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता आढळून आले. तसेच गर्भनिरोधक औषधी मिळवून देणाऱ्या एजन्सीचीही तपासणी करण्यात आली. तेथेही कांही प्रमाणात गर्भनिरोधक औषधी मिळून आली. त्यामुळे अन्न व औषध विभागाने मेडिकलसह औषध पुरवठा करणाऱ्या एजन्सीवरही कारवाई केल्याचे सांगण्यात येत आहे. |