उस्मानाबाद /प्रतिनिधी-
दहावीच्या परीक्षेत जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांनीही चांगली गुणवत्ता मिळविली असून, शाळांचा सरासरी निकाल ६४.४४ टक्के लागला आहे. १० शाळांचा निकाल ७५ टक्क्यांपेक्षा अधिक लागला असून, त्यात माडजच्या शाळेचा निकाल १०० टक्के असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा तथा शिक्षण सभापती अर्चनाताई पाटील यांनी दिली. 
दहावी परीक्षेच्या निकालाची माहिती देण्यासाठी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार, शिक्षणाधिकारी सविता भोसले उपस्थित होत्या. उपाध्यक्षा पाटील म्हणाल्या, यावर्षी दहावी परिक्षेत राज्याची टक्केवारी ज्या पध्दतीने घटली आहे, त्याच पध्दतीने जिल्हा परिषदेच्या शाळेतील निकालावरही परिणाम झाला आहे. मात्र, बदललेला अभ्यासक्रम तसेच मूल्यांकनाचे गुण वगळून आलेला निकाल समाधानकारक आहे. जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या ५४ माध्यमिक शाळा असून, त्यापैकी माडज, सलगरा, भूम, माळुंब्रा, जागजी, परंडा, वालवड, जळकोट, शिरसाव, दहिफळ या १० शाळांची निकाल ७५ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. माडज जिल्हा परिषद शाळेचा निकाल १०० तर सलगर शाळेचा निकाल ९० टक्के आहे. समृध्दी विभूते (९५.६०), हर्षदा जाधव (९३.८०), नौसिन पटेल (९२.८०),प्रणिता सावंत (९२.६०), सारिका माळी (९१.८०),ममता तांदळे (९१.६०), प्रिय शेळके (९१.६०), सानिया चव्हाण (९१.४०), सान्या मेंढके (९१), श्रध्दा माने (९०.६०), रेश्मा शिंदे (९०.४०) या विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण घेत यश मिळविले आहे. मस्सा येथील हर्षदा जाधव या विद्यार्थिनीने गणित विषयात १०० पैकी १०० गुण मिळविले आहेत. 
शाळांचा सन्मान करणार उपाध्यक्षा पाटील म्हणाल्या, जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी चांगली गुणवत्ता मिळविल्याबद्दल त्यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात येणार आहे. यापूर्वी गुणवत्ता मिळविलेल्या शाळांचा सन्मान होत नव्हता. मात्र, यापुढे सन्मान करू, या यशामध्ये शिक्षक, मुख्याध्यापक आणि एकूणच शिक्षण विभागाचा तसेच विद्यार्थ्यांचा मोलाचा वाटा आहे. 
 
Top