उस्मानाबाद /प्रतिनिधी- दि. 17 मे 2019 रोजी येथील कृषी सेवा केंद्राची जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. उमेश घाटगे व जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक श्री. सी.जी.जाधव यांनी तपासणी केली होती. त्यामध्ये ज्योती पेस्टीसाइड, सहरानपूर उत्पादित फोरेट या किटकनाशकाचा साठा आढळून आला होता. कीटकनाशक कायदा 1968 अन्वये हा नमुना काढून कीटकनाशक तपासणी प्रयोगशाळा, पुणे येथे तपासणीकरिता पाठविण्यात आला होता. या प्रयोगशाळेकडून याबाबतचा अहवाल प्राप्त झाला असून विश्लेषण अहवालानुसार फोरेट या किटकनाशकाचे शून्य टक्के घटक आढळून आल्याने त्याची जिल्हाभरात विक्री तात्काळ बंद करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.आतापर्यंत 2 हजार 556 किलो (रक्कम दोन लाख 55 हजार सहाशे) चे विक्री बंद आदेश करण्यात आलेले असून कीटकनाशक कायदा 1968 व नियम 1971 अन्वये पुढील कार्यवाही करण्यात येत आहे.
तरी शेतकऱ्यांनी बियाणे, खते, कीटकनाशके खरेदी करीत असताना अधिकृत परवानाधारक कृषी सेवा केंद्रातूनच कृषी निविष्ठांची खरेदी करावी. खरेदी करताना पक्की पावती घ्यावी. पावतीवर विक्रेत्याची स्वाक्षरी व मोबाईल नंबरची नोंद करून घ्यावी. बियाणे खरेदी केल्यानंतर त्याचे वेस्टन, पावती पिशवीत व त्यातील थोडे बियाणे हंगाम संपेपर्यंत
जतन करून ठेवावेत. बियाण्यांची पाकिटे सीलबंद असल्याची खात्री करावी व त्यावरील अंतिम मुदत पाहून घ्यावी. नामांकित कंपनीचे बियाणे, खते व कीटकनाशके खरेदी करावीत. कमी वजनाच्या निविष्ठा छापील किंमतीपेक्षा जास्त दराने विक्री आदी कारणांसाठी तक्रार
असल्यास नजीकच्या तालुका कृषी अधिकारी, पंचायत समिती कृषी अधिकारी कार्यालयाशी तात्काळ संपर्क साधावा तसेच ज्योती पेस्टीसाइड, सहरानपूर उत्पादित फोरेटची खरेदी करू नये, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. उमेश घाटगे यांनी केले आहे.