उस्मानाबाद /प्रतिनिधी-
 हवामानातील बदल, निसर्गाचा लहरीपणा या गोष्टींना दोष देत न बसता शेतकर्‍यांनी शेती व शेती तंत्रज्ञानाबाबत नवनवीन माहिती मिळवून परिस्थितीवर मात मिळवायला शिकलं पाहिजे, असे प्रतिपादन पालकमंत्री अर्जुन खोतकर यांनी काल येथे केले.
जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय व प्रकल्प संचालक (आत्मा) यांच्या एकत्रित प्रयत्नांनी 2जून ते 5 जून या कालावधीत कृषी प्रदर्शन तथा महोत्सवाचे आयोजन नगरपरिषद नाट्य सभागृह तसेच यशराज लॉन्स येथे करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशीच्या परिसंवादाच्या उद्घाटनाच्या वेळी पालकमंत्री श्री.खोतकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार ज्ञानराज चौगुले, शंकरराव बोरकर, संजय पाटील दुधगावकर, कैलास पाटील, जिल्हा परिषद सदस्य श्री. साळवी, जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, जिल्हा कृषी अधीक्षक उमेश घाटगे, प्रकल्प संचालक (आत्मा) श्री. जितेंद्र शिंदे ,कृषी उपसंचालक श्री. सुभाष चोले, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. नामदेव आघाव, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. पसरटे, प्रकल्प
उपसंचालक (आत्मा) श्री. केशव मलगुंडे, प्रगतशील व प्रयोगशील शेतकरी श्री. सत्यवान सुरवसे हे उपस्थित होते.
पालकमंत्री श्री.खोतकर पुढे म्हणाले, आपल्या जीवनाची दिशा आपणच ठरविली पाहिजे. नकारात्मक विचारांना थारा न देता संशोधनात्मक वृत्ती जोपासायला हवी. शेती नियोजन करताना लहान-सहान सर्वच गोष्टींचे काटेकोर नियोजन आवश्यक आहे.
 शेतकऱ्यांनी पर्यावरणाचा अभ्यास करून अंदाज घेऊन त्याप्रमाणे विविध पिकांच्या लागवडीचे अभ्यासपूर्ण नियोजन करावे, असे सांगून अशा प्रकारच्या संपन्न अनुभव देणाऱ्या,अभ्यासपूर्ण माहिती देणाऱ्या, नवनवीन तंत्रज्ञानाची, पीक पद्धतीची माहिती देणाऱ्या प्रदर्शन व कृषी महोत्सवामुळे उस्मानाबादमधील शेती व शेतकरी निश्चितच समृद्ध होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला तसेच अशा प्रकारचे अत्यंत सुंदर असे प्रदर्शन व कृषी महोत्सव आयोजित केल्याबद्दल पालकमंत्री श्री. खोतकर यांनी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, जिल्हा कृषी अधीक्षक उमेश घाटगे, प्रकल्प संचालक (आत्मा) जितेंद्र शिंदे यांचे विशेष अभिनंदन केले.
यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती मुधोळ-मुंडे यांनी अतिशय उत्साहवर्धक मनोगत व्यक्त करताना शेतकऱ्यांना शेती नियोजन,पाणी वापराचे नियोजन यांचा अभ्यास करण्याचे  आणि आम्ही मागासलेल्या जिल्ह्याचे आहोत या वाक्याचा आणि विचारांचा त्याग करण्याचे आवाहन केले.
प्रगतशील व प्रयोगशील शेतकरी सत्यवान सुरवसे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना पाणी नियोजन, मजूर नियोजन, शेतमालाच्या विक्रीचे नियोजन याविषयीचे वस्तुस्थितीदर्शक अनुभव सांगितले व शेतीविषयक व्यवस्थित नियोजन केल्यास शेतीत निश्चितच यश मिळेल, हा आत्मविश्वास बाळगा असे आवाहन केले.
या निमित्ताने आमदार ज्ञानराज चौगुले यांनीही उपस्थित शेतकऱ्यांशी दिलखुलास संवाद साधला. या परिसंवादाच्या अनुषंगाने पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. पसरटे यांनी उपस्थित शेतकर्‍यांना या परिसंवादाचे महत्त्व, त्यातील विषय व संबंधित वक्ते या विषयांची सविस्तर माहिती दिली.
सुरूवातीस या परिसंवादाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले तर प्रास्ताविक जिल्हा कृषी अधीक्षक उमेश घाटगे यांनी केले, सूत्रसंचालन कृषी उपसंचालक श्री. सुभाष चोले यांनी केले आणि आभार प्रदर्शन प्रकल्प संचालक (आत्मा) जितेंद्र शिंदे यांनी केले.
 
Top