उस्मानाबाद /प्रतिनिधी-
आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या कायाकल्प अभियानांतर्गत जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर, कळंब, परंडा तसेच ग्रामीण रुग्णालय सास्तूर व लोहारा या आरोग्य संस्थांना प्रत्येकी रुपये एक लाख रुपयांचा कायाकल्प पुरस्कार जाहीर झाला आहे. राज्यातील सर्व आरोग्य संस्थांमधील सेवांची गुणवत्ता सुधारणे तसेच आरोग्य संस्था नेहमी स्वच्छ व नीटनेटके राहण्यासाठी स्वच्छ भारत अभियानांतर्गत आरोग्य संस्थांमध्ये कायाकल्प अभियान राबविण्यात येत आहे.
या अभियानात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आरोग्य संस्थेस पुरस्कार देण्यात येतो. यासाठी आरोग्य संस्था स्तर, जिल्हास्तर व राज्य स्तरावरून मूल्यांकन करण्यात येते. राज्यस्तरीय पथकामार्फत फेब्रुवारी 2019 मध्ये राज्यातील विविध आरोग्य संस्थांचे मूल्यांकन करण्यात आले होते.
या मूल्यांकनादरम्यान रुग्णालयांमधील जैव वैद्यकीय घनकचरा व्यवस्थापन, जंतुसंसर्ग व्यवस्थापन, रुग्णालयातील स्वच्छता, आरोग्य सेवा इत्यादी बाबींची पाहणी करण्यात आली होती.
हा पुरस्कार मिळण्यासाठी आरोग्य उपसंचालक डॉ. एकनाथ माले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.राज गलांडे पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. वडगावे यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले. जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनी वेळोवेळी दिलेल्या सूचना तसेच प्रशिक्षण इत्यादीच्या माध्यमातून या
रुग्णालयांना पुरस्कार मिळण्यासाठी मोलाचे सहकार्य लाभले. उल्लेखनीय बाब म्हणजे ग्रामीण रुग्णालय, सास्तूर या रुग्णालयाला गत तीन वर्षांपासून व उपजिल्हा रुग्णालय, कळंब या रुग्णालयास गत दोन वर्षापासून सलग कायाकल्प पुरस्कार प्राप्त झाले आहेत.